विधानसभा निवडणूक रणसंग्राम २०२४
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत. पुढच्या तीन महिन्यांनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळं राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकीसाठी सर्वेक्षण सुरु झालं असून उमेदवारी कोणाला द्यायची याची चाचपणी सुरु झाली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांना आठवण होऊ लागलीय ती मतदार राजाची. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फॉर द पीपल न्यूज नं सुरु केलेल्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष भागात आज आपण पुणे शहरातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील मतदारांना काय वाटतं? त्यांच्या काय अपेक्षा आहेत? पाच वर्षांत काय बदल झाला? दिलेल्या आश्वासनांची पूर्तता किती झाली आणि इथले प्रमुख मुद्दे काय आहेत यासंदर्भात जाणून घेणार आहोत…
कसबा पेठ हा अठरा पगड जाती धर्माचं प्रतिनिधीत्व करणारा मतदार संघ आहे. २०१९ च्या आकडेवारीनुसार कसबा पेठ विधानसभेतील मतदारांची संख्या २ लाख ७५ हजार ६७९ इतकी होती.ब्राह्मण समाजाची लोकसंख्या अधिक असलेला मतदार संघ म्हणून हा मतदार संघ ओळखला जात होता परंतु, गेल्या २० वर्षात मध्यवर्ती शहरातली वाहतूक समस्या वेगानं वाढली आणि ही दररोजची समस्या झाल्यामुळं मोठ्या संख्येनं इथले रहिवाशी कोथरुड, सिंहगड रोड, सातारा रोड परिसरात शिफ्ट झाले आहेत. त्यामुळं या मतदार संघात प्रामुख्यानं संख्येनं सर्वाधिक असलेल्या ब्राह्मण मतदारांची संख्यादेखील घटली आहे. त्याऊलट बारा बलुतेदारांची लोकसंख्या जास्त आढळून येते. त्याबरोबरच मारवाडी, गुजराती, जैन व मुस्लिम समाजही इथं आढळतो. भारतीय जनता पार्टीचे गिरीश बापट यांनी कसबा पेठ विधानसभेचे आमदार म्हणून सर्वाधिक व सलग २५ वर्षे प्रतिनिधीत्व केलंय त्यांची लोकप्रियता सर्व समाजात दिसून यायची. ब्राह्मण समाज अधिक असला तरी गिरीश बापट यांनी ओबीसी, बारा बलुतेदार व मुस्लिम समाजाशी चांगले संबंध ठेवले होते. त्याचा परिणाम म्हणून त्यांची आमदार म्हणून कारकीर्द मोठी झाली. त्यांच्यानंतर २०१९ मध्ये बापट खासदार झाले आणि त्यांच्या जागेवर मुक्ता टिळक यांना भाजपानं उमेदवारी दिली. त्या देखील विजयी झाल्या. परंतु, त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी विजय खेचून आणला आणि भाजपाला मोठा धक्का बसला.भाजपानं ब्राह्मण समाजाला उमेदवारी नाकारल्यानं पराभव झाल्याची चर्चा त्यावेळी झाली. परंतु, हे एकच कारण नव्हतं. बापट यांनी जशी सर्व अठरापगड जाती व विविध धर्मियांची मोळी बांधली होती. तशी मोळी बांधून लढणारा त्यांच्याकडं उमेदवार नव्हता. हेदेखील लक्षात घ्यायला हवं.कसबा पेठ विधानसभेत १९९५ ते २०२३ अशी सलग २९ वर्ष अजिंक्य राहिलेल्या भारतीय जनता पार्टीला काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी पराभवाचा धक्का दिला. २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत १० हजार ९१५ मतांनी धंगेकरांनी विजय मिळवला खरा. पण त्यानंतर आता २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर रविंद्र धंगेकर हेच काँग्रेसकडून उमेदवार होते. या निवडणुकीत मात्र, धंगेकर यांना स्वतःच्याच कसबा पेठ विधानसभेत मोहोळ यांच्यापेक्षा कमी मतदान मिळालंय. त्यामुळं काँग्रेससाठी व महाविकास आघाडीसाठी ही चिंतेची गोष्ट झालीय आणि भाजपाच्या गोटात मात्र, आनंद झालाय.आता तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक आलीय. त्यामुळं सर्वच इच्छुकांनी तयारी सुरु केलीय. महायुतीत हा मतदार संघ भाजपाकडं तर, महाविकास आघाडीत काँग्रेसकडं असणार यात शंका नाही.दुसरी महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथं उमेदवार देणार की, महायुतीत सामिल होणार हे अद्याप ठरलं नाही. वंचित बहुजन विकास आघाडी, एमआयएम यांच्याकडून कोण उमेदवार असणार? निवडणुकीत छोटे छोटे घटक अनेकदा निकालावर कमालीचा परिणाम घडवून आणतात.