लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आणि आता महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते आणि आरएसएस च्या पदाधिकाऱ्यांकडून लक्ष झालेल्या अजित पवार यांनी स्वतःचं व पक्षाचं ब्रँडिंग करण्यासाठी २०० कोटी रुपये देऊन सल्लागार नियुक्त केल्याची चर्चा जोरात आहे. नेमकी ही चर्चा का होतेय? कुणी आरोप केले? आणि एकूणच हे प्रकरण काय आहे. याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं जाणून घेऊयात…
अजित पवार पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा माणूस. प्रशासनावर पकड असलेला नेता. शब्दांचा पक्का… असं वर्णन अजित पवारांचं केलं तर, ते चुकीचं ठरणार नाही. परंतु, इतक्या पावरफुल नेत्यावर स्वतःचं व पक्षाचं ब्रँडिंग करण्याची वेळ का आलीय. अशी चर्चा सर्वत्र सुरुय. खुद्द अजित पवार हे स्वतःच एक ब्रँड असताना आता आणखी ब्रॅंडिंग कशाला असा प्रश्नही लोक विचारतायत. आता काहीही असलं तरी अजित पवारांनी निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा यांची नियुक्ती त्यांच्या व पक्षाच्या ब्रँडिंगसाठी केली असल्याची चर्चा आहे.
पवार घराण्याचा राजकीय वारसा असला तरी अजित पवार यांनी स्वतःची वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात उमटवली आहे. काका शरद पवार यांच्या सोबत होते तेव्हा अजित पवार यांचा रुबाब वेगळाच होता. राज्यात कोणीच अजित पवारांना भिडल्याचं फारसं कधी दिसलं नाही. त्यांच्यावर टीका करताना देखील लोक मागचा पुढचा विचार करून बोलायचे. परंतु, आता काकांना रामराम ठोकत पक्ष आणि पक्षातले ४० आमदार आणि नेते सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीबरोबर जात महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवारांची वाट बिकट होऊ लागल्याचं दिसू लागलं. त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आला. महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ चार जागा मिळाल्या. त्यातली केवळ एक निवडून आली. बारामतीमधून स्वतःच्या पत्नीला तिकीट देण्याची खेळी अंगलट आली आणि अजित पवारांच्या पदरी पराभव आला. तिथं सुप्रिया सुळे यांनी मोठा विजय प्राप्त झाला. शिवाय या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं कोणीही उठलं आणि त्यानं अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांवर तोंडसुख घेत जोरदार टीका केली. ज्या विजय शिवतारे यांना अजित पवारांनी दम दिला. त्या विजय शिवतारे यांनी मागचीपुढची सर्व गोळाबेरीज करून अजित पवारांवर जोरदार टीका करीत हिसाब चुकता केला. भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय पटवून देताना अजित पवार आणि सर्वांचीच दमछाक होत असल्याचं दिसून येत होतं. आणि त्यामुळंच आता तोंडावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अजित पवारांनी ब्रँडिंग करण्याचा मार्ग निवडल्याचं दिसतं.