महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून तिन्ही पक्षांत वाद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा ठोकला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आत्तापासूनच जागावाटपावरून दावेदारी सुरु झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकऱ्यांचा झालेल्या बैठकीत विधानसभेची जागा काँग्रेसची असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे सह्यांचे निवेदन देखील देण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार रोहित पवारांसमोर स्थानिक काँग्रेस नेत्त्यांच्या मनधरणीचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बारामतीची जागा खाली झाली असून रोहित पवार यांनी तिथून लढावं असंही स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
सोमवारी ( २९ जुलै ) रोजी सायंकाळी कर्जत येथील विश्रामगृहावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद झाली. त्यात ही माहिती देण्यात आली.विधानसभेसाठी ज्येष्ठ नेते ॲड. कैलास शेवाळे यांच्या उमेदवारीची मागणी सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी बोलताना ॲड. शेवाळे म्हणाले, कर्जत-जामखेड मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.या मतदारसंघातून स्व. आबासाहेब निंबाळकर, दोन पंचवार्षिक निकाळजे गुरुजी, तर एक पंचवार्षिक विठ्ठलराव भैलुमे यांनी काँग्रेसकडून प्रतिनिधित्व केले आहे. २००९ मध्ये हा मतदारसंघ खुला झाल्यानंतर स्व. बापूसाहेब देशमुख यांचा निसटता पराभव झाला होता.२०१४ मध्ये किरण पाटील यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. २०१९ ला काही राजकीय तडजोडीअंती ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली. आमदार रोहित पवार काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या सहकार्याने आमदार झाले; मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी कायम मित्रपक्षाला सापत्न वागणूक दिली. कधीच काँग्रेस पक्षाला आणि पदाधिकाऱ्यांना मानाचे स्थान दिले नाही, अशी टीका शेवाळे यांनी केली.यासह इतर पदाधिकाऱ्यांनी देखील मतदारसंघात काँग्रेसला डावललं असल्याची खंत व्यक्त केली तसेच राष्ट्रवादीलाच जास्तीत जास्त संधी दिली,काँग्रेसवर अन्याय झाला असल्याचं ही पदाधिकारी म्हणाले. कर्जत-जामखेड हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळावी. पाच वर्षांसाठी आम्ही ही जागा रोहित पवार यांना दिली होती.या मतदारसंघात काही प्रमाणात अजित पवारांचा प्रभाव आहे. ते त्यांच्यापासून बाजूला गेल्याने मतांची विभागणी होणार आहे. आमचा काँग्रेसचा मतदार आहे तसाच जागेवर आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला फायदेशीर राहील असंही मत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे आमदार रोहित पवार यांना स्वतःच्याच मतदारसंघात महाविकास आघाडीतून आव्हान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता हा वाद मिटणार की दावेदारी अधिक वाढणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.