लोकसभा निवडणुकीत दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निलेश लंके यांनी भाजपच्या डॉ.सुजय विखे पाटील यांचा 28,929 मतांनी पराभव केला होता. दरम्यान, पराभवानंतर सुजय विखे पाटील हे विधानसभा लढण्यासाठी तयारीला लागले आहेत. संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची त्यांची तयारी असून पक्षाकडे याबाबत इच्छा व्यक्त केल्याची माहिती सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
‘शिर्डी विधानसभा ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाईल, अशी माझी अपेक्षा आहे. कारण पक्षाचा निर्णय होणे अद्याप बाकी आहे. तिकीट कोणाला मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे. पक्ष निर्णय घेईल, पक्ष त्यांना संधी देईल. आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारात साहेबच सर्वप्रथम असणार आहेत. राहिला मुद्दा माझा, आता मला बऱ्यापैकी वेळ आहे, त्यामुळे आजूबाजूंच्या मतदार संघाचा आढावा घेऊ’, असे सुतोवाच त्यांनी केले आहे. सुजय विखे यांनी संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. याबाबत त्यांनी पक्षाकडे इच्छा देखील व्यक्त केली आहे. जनता व पक्षाचा निर्णय झाल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटलंय. सुजय विखे पाटील हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले तर त्याचा थेट सामना बाळासाहेब थोरात यांच्या रंगू शकतो. संगमनेर विधानसभेत बाळासाहेब थोरात हे सध्या विद्यमान आमदार आहेत. तर सुजय विखे यांनी राहुरी विधानसभा लढवल्यास प्राजक्त तनपूरे विरूद्ध सुजय विखे अशी लढत होऊ शकते.आता सुजय विखे यांना नेमकी कुठल्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार? थोरात विखे सामना रंगणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. कारण लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची वेध लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जनतेने सुजय विखेंना डावलून निलेश लंके यांना पसंती दिली. यानंतर आता सुजय विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याने अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा आहे.