विधानसभा निवडणुका जाहीर होताच तिकीट मिळण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळतिये. आपल्या कुटुंबातूनच राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी आपल्या मुलांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी अनेक नेत्यांकडून केली जात आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, आमदार बबन शिंदे यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांच्या नावाची चर्चा असतानाच खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना देखील विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु आहे.
संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी एमआयएम चे इमित्याज जलील यांचा १,३४,६५० मतांनी पराभव केला. पैठण विधानसभा मतदारसंघावर त्यांची चांगलीच पकड आहे. त्यामुळे ते आत्तापासूनच तयारीला लागलेत. विलास भुमरे यांनी आपल्या मुलाचे नाव चर्चेत राहावे यासाठी त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आपल्यासोबत सामील करून घेतले होते. पैठण मतदारसंघातील प्रमुख नेत्यांचे नंबर पाठ करून विधानसभेसाठी पूर्व तयारी करून आपली ताकद वाढवत आहेत. संदीपान भुमरे हे एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले आणि अधिक जवळचे आहेत त्यामुळे आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. संदीपान भुमरे ह्यांनी २०१४च्या पैठण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय वाघचौरे यांचा २५,०३९ मतांनी पराभव केला होता. तर २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या दत्तात्रय गोरडे यांचा १४,१३९ मतांनी पराभव केला होता. त्यामुळे आता हा मतदारसंघ आपल्या मुलाला मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या मतदारसंघातून महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपला दावा सांगण्याची शक्यता आहे.