वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रशिक्षणार्थी IAS पद केंद्रीय लोकसेवा आयोगाने तात्पुरतं रद्द केलं आहे… त्याचबरोबर भविष्यातील सर्व परीक्षांना बसण्यास पूजा खेडकर यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. यूपीएससीने केलेल्या चौकशीत पूजा खेडकरांनी ‘नागरी सेवा परीक्षा-2022’च्या नियमांचा भंग केल्याचं समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय काय घडलं? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेउयात…
पूजा खेडकरांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारवर नोकरी मिळवल्याचा आरोप करण्यात आला. माहिती अधिकारातून अनेक खुलासे यासंबंधी पुढं येत गेले. याच दरम्यान पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ समोर आला. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातील धडवली गावात जागेच्या प्रकरणावरून मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला पिस्तुल दाखवित धमकावल्याचा तो व्हिडिओ होता. त्यांच्यासोबत काही बाउन्सरदेखील त्या व्हिडिओमध्ये दिसत होते. या व्हिडिओ नंतर मारहाण, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी, दमदाटी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हेदेखील निवृत्त सनदी अधिकारी आहेत. प्रदूषण महामंडळाचे आयुक्त म्हणून ते निवृत्त झालेत. त्यानंतर त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून नुकतीच झालेली निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवलीय. त्यांनीदेखील बारामतीमध्ये जमीन घेण्यासाठी वडिलांचं नाव बदलल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिलीप धोंडीबा खेडकर असं नाव असताना त्यांनी वडिलांच्या नावात कोंडीबा असा बदल केला. या प्रकरणी दिलीप खेडकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु आहे. तर पूजा खेडकर यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वेगवेगळी नावं बदलून ११ वेळा परीक्षा दिल्याची माहिती समोर आली. त्यांच्याविरोधात वेगवेगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्यानंतर यूपीएससीने त्यांना लालबहादूर शास्त्री अकादमी इथं परत बोलावलं. तसंच यूपीएससीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांची चौकशी देखील सुरु झाली. या प्रकरणी पूजा खेडकर यांना म्हणणं मांडण्यासाठी यूपीएससीने तारीख देखील वाढवून दिली. पण पूजा खेडकर यांनी यूपीएससीच्या नोटीसला उत्तर दिलं नाही. पूजा खेडकर अनेक दिवस नॉट रिचेबल होत्या. त्यामुळं अखेर यूपीएससीनं पूजा खेडकर यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आणि त्यांचं प्रशिक्षणार्थी IAS पद रद्द केलं. पूजा खेडकर यांना आता यापुढे कोणतीही परीक्षा देता येणार नाही. पूजा खेडकर प्रकरणाची दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. यावेळी यूपीएससीचे वकील नरेंद्र कौशिक यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की फक्त पूजाचं नाव बदललं गेलं नाही तर, तिच्या वडिलांचं नाव देखील तिने सातत्यानं बदललं आहे. तिला ते करायचा अधिकार आहे का? तिच्या आईचं नाव तिने मनोरमा बुधवंत केलं. जे की मनोरमा दिलीप खेडकर होतं. तिने संपूर्ण व्यवस्थेसोबत फ्रॉड केला आहे. एका प्रामाणिक उमेदवाराची संधी हिरावून घेतली आहे. यूपीएससीकडून पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करण्यामागील 3 कारणं सांगण्यात आली आहेत. तसेच खेडकर यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास पहिलं कारण हे की त्यांनी बोगस कागदपत्र दिली, दुसरं कारण म्हणजे यूपीएससीच्या नोटीशीला उत्तर दिलं नाही आणि तिसरं कारण म्हणजे सीएसई २०२२ च्या नियमांचं उल्लंघन केलं.