लोकसभेला महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्याकडे पक्षाचे चिन्ह गेल्यानंतर सुद्धा शरद पवार यांनी आपली राजकीय ताकद दाखवत लोकसभेला पक्षाने १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला. आता विधानसभेला देखील जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रयत्न करत आहे. यासाठी पक्ष तयारीला देखील लागला आहे. विधानसभेला कार्यकर्त्यांनी फिल्डवर जाऊन काम करावे यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवककडून २८८ मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
लोकसभेप्रमाणेच विधानसभेत यश मिळावे यासाठी स्थानिक पातळीवर पक्षाच काम करण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि पक्षाच्या भूमिका लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी या निरीक्षकांवर असणार आहे. पक्ष फुटीनंतरही लोकसभेत मिळालेल्या यशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. याच गोष्टीचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ग्राउंड लेव्हलवर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी राज्याभरातील २८८ मतदारसंघासाठीच्या निरीक्षकांची नेमणूक केली आहे.