मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे येत्या २९ ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या लढ्याची पुढची दिशा ठरवणार आहेत. २० जुलैला सुरु केलेलं उपोषण त्यांनी काही दिवसांपूर्वीच स्थगित केलं. आणि त्यानंतर शांतता रॅलीला सुरुवात केली. राज्याचा दौरा पूर्ण केल्यानंतर २९ ऑगस्टला आपण आमदारांना पाडायचं की स्वतः मैदानात उतरायचं की तिसऱ्या आघाडीत जायचं किंवा आणखी काही वेगळा निर्णय घ्यायचा याबाबत ते निर्णय घेणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याचे संकेत दिले आहेत. उमेदवार पाडायचे की उभे करायचे हे फक्त समाजाला विचारून निर्णय घ्यायचं बाकी आहे. तशी आम्ही दोन्ही तयारी केली असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय. पण आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकीत बदललेलं चित्र पाहता याचा नेमका कोणाला फटका बसणार आणि कोणाला फायदा होणार ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..
मनोज जरांगे पाटील यांनी आधीच सोशल इंजिनिअरिंग साधत मराठा समाजासोबतच दलित, मुस्लीम आणि धनगर समाजाला आपलंस करण्याचा प्रयत्न केला आहे. सगेसोयऱ्यांच्या नियमाबाबत सरकारकडून हालचाल दिसत नसल्यामुळे जरांगेंनी विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीला बसला. मराठवाड्यात भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही. पण, त्यावेळी जरांगे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये नव्हते. पण विधानसभेला ते स्वतः मैदानात उतरून जास्तीत जास्त ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार असल्याचं बोलत आहेत. असं झाल्यास महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीचं ही टेंशन वाढू शकतं. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऑक्टोबर २०२३ मध्ये जालन्यातील अंतरवली सराटी या गावातून उपोषणाला सुरुवात केली होती. जरांगे यांचं हे आंदोलन सरकारला व्यवस्थित हाताळता आलं नाही. सरकारने वारंवार आश्वासने दिली. पण प्रत्यक्षात काहीच केलं नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये झाली होती. लोकसभा निवडणुकीवेळी मनोज जरांगे यांनी कुणाला मतदान करा हे सांगितलं नाही. फक्त त्यांनी मराठा विरोधी लोकांना पाडा असं आवाहन केलं होतं. मात्र, त्यांच्या आंदोलनाचा सर्व रोख भाजपविरोधी दिसून आला. मनोज जरांगे पाटील यांचं संपूर्ण आंदोलन केवळ महायुतीतील नेत्यांशीच वाजलं होतं. जरांगे यांनी सातत्याने दोन नेत्यांवर टीका केली. एक म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ. या दोन्ही नेत्यांवर जरांगे यांनी नुसती टीका केली नाही तर त्यांच्यावर गंभीर आरोपही केले होते. त्यानंतर शेवटी शेवटी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांनीही फसवणूक केल्याचं म्हटलं होतं. तर आपल्या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी वारंवार यावं लागल्याचा दावाही जरांगे यांनी केला होता. यातून जरांगे यांनी सरकार आपल्या विरोधात असल्याचा संदेश समाजात दिला होता. जरांगे यांना विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातून मोठा पाठिंबा मिळाला होता. मराठवाड्यातील ८ पैकी ७ जागांवर महायुतीचा पराभव झाला. जालन्यात रावसाहेब दानवे, बीडमधून पंकजा मुंडे या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला.. यासह नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर आणि धाराशिव या पाच मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पडले. त्यामुळे विधानसभेला भाजपला जरांगे पाटील यांच्या फॅक्टरचा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि खानदेशमधील जवळपास ५० जागा लढण्याची तयारी जरांगेंनी केली आहे. जरांगे सध्या महाराष्ट्रात दौरा करत आहेत. आरक्षणाच्या आडून राजकारण होत असल्याचं वाटू नये यासाठी जरांगे पाटील सावध भूमिका घेत असल्याचं दिसून येतं. त्यामुळेच त्यांनी आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा महायुती आणि महाविकास आघाडीवर सोपवून दिला आहे. निर्णय तुम्ही घ्या. सगेसोयऱ्यांची मागणी मान्य करा. अन्यथा मी माझी भूमिका स्पष्ट करून विधानसभा लढण्यावर किंवा पाडण्यावर ठामच आहे. एकप्रकारे असा इशाराच जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.