लोकसभेला महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात विधानसभेच वारं वाहू लागलंय. लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील जास्तीत जास्त जागा निवडून याव्या यासाठी महाविकास आघाडीने तयारीला सुरवात केली आहे. उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत दिल्लीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदावरून चर्चा झाल्याचं बोललं जातंय.. परंतु यादरम्यानच मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झालीय … नेमकं मतभेद असण्याचं कारण काय.. ? मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत नेमकी काय धुसपूस सुरु झाली आहे..? हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
लोकसभेला महाविकास आघाडीने एकूण ४८ जागा लढवल्या त्यापैकी काँग्रेसने १७ जागा लढवल्या व १३ जागांवर विजय मिळवला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एकूण २१ जागा लढवल्या त्यापैकी ९ जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने १० जागा लढवल्या आणि ८ जागांवर विजय मिळवला. सध्याची विधानसभेतील महाविकास आघाडीची स्थिती पाहिली तर ती फारशी चांगली नाही. महायुतीचे विधानसभेत एकूण २०० आमदार आहेत तर महाविकास आघाडीचे केवळ ६५ आमदार आहेत त्यापैकी काँग्रेसचे ३७ आमदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकूण १५ आमदार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे केवळ १२ आमदार आहेत. आणि १ अपक्ष आमदार आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबरोबर असलेल्या आमदारांची संख्या कमी झाली. आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात जे संभाव्य फॉर्म्युले समोर येत आहेत त्यानुसार.. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस १०० जागा लढवण्याच्या तयारीत आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे १०० जागा लढवण्यास इच्छुक असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ८० जागा लढवणार असल्याचं बोललं जातंय. परंतु उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. या भेटीत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये कोण किती जागा लढवणार तसंच पुढील महिन्याच्या आत जागावाटप केलं जावं… तसंच एकाच जागेवर तिन्ही पक्षांनी दावा केला तर त्यावर योग्य तो तोडगा काढण्यात यावा अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीच चर्चा या दिल्ली दौऱ्यातील बैठकीत करण्यात आली नाही. निवडणुकीच्या निकालानंतरच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अंतिम केला जाईल असं बैठकीत म्हटलं गेल्याचं बोललं जातंय. निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यात येईल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष आणि काँग्रेस पक्षाची आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मात्र उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असं विधान त्यांनी केलं होत. त्यामुळं मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसत होतं… आता उद्धव ठाकरे यांच्या तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यांनंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याबाबत अनेक विधानं येत आहेत याबाबत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील विधान केलंय.