उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यवतमाळच्या दौऱ्यावर असताना त्यावेळी भर सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. बदलापूर इथं झालेल्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली होती. तोंडाला काळे मास्क लावून हा निषेध करण्यात आला होता. यावर यवतमाळच्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी ‘विरोधक तोंडाला काळ्या पट्ट्या लावून बसले आहेत, आता मी सांगतो तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत. कारण तुम्ही समाजात अराजकता निर्माण करण्याचे काम करत आहात. तुम्ही संवेदनशील बाबींवर राजकारण करत आहात’ असे म्हणत महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.याआधी, महाविकास आघाडीचे सरकार असताना महायुती सरकारने आणलेल्या योजना त्यांनी बंद केल्या.आम्ही आणलेली लाडकी बहीण योजना ही त्यांचे सरकार आले तर बंद करतील. मोफत सिलेंडर योजना बंद केली जाईल. परंतु असे होणार नसून, आमच्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आम्हालाच असणार आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतरही पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. कारण आमच्या बहिणींचे प्रेम अनमोल आहे. निखळ आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचा लाभ 10 टक्के महिलांना देखील होणार नाही असे विरोधक सांगत आहेत परंतु, आत्ता पर्यंत दीड कोटी महिलांना या योजानेचा फायदा झाला आहे. या योजनेपासून कोणत्याही बहिणीला वंचित ठेवलं जाणार नाही. विरोधक ही योजना बंद कशी करता येईल हे पाहत आहेत परंतु, अखेरचा अर्ज येईपर्यंत आणि सप्टेंबर महिन्यातही या योजनेचा लाभ मिळणार आहे. असे फडणवीस म्हणाले. त्याचप्रमाणे, विरोधक हे बदलापूरच्या घटनेवरून, आम्हाला लाडकी बहीण योजना नको तर, बहिणीला सुरक्षा द्या असं म्हणत आहेत. परंतु आम्ही सुरक्षाही देऊ आणि लाडकी बहीण योजना ही देऊ. आम्ही शाळेपासून संस्कार रुजवणार आहोत. त्याचप्रमाणे, विरोधकांनी संवेदनशील बाबींवर राजकारण करू नये असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.