आगामी विधानसभा निवडणूक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना महायुतीमधील प्रमुख तीन घटक पक्षांव्यतिरिक्त असलेल्या मित्र पक्षांनी आता जागावाटपात चांगल्या जागा मिळाव्यात म्हणून आग्रह धरला आहे. महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटानं महायुतीचं टेन्शन वाढवलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठावले गटानं नेमकं काय टेन्शन वाढवलं? मित्र पक्ष महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार आहेत का? या संदर्भातच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात..
आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाबाबत महायुतीमध्ये चर्चा सुरु आहेत. महायुतीत मुख्य घटक पक्ष तीन असून तेच विधानसभेला जास्तीत जास्त जागा लढवणार आहेत. यामुळं महायुतीतला मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटानं यावर नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभेला आम्ही जुळवून घेतलं परंतु, विधानसभेला आम्हाला १२ ते १५ जागा सोडण्यात याव्या अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटानं केली आहे. आमची मागणी पूर्ण न झाल्यास आंबेडकरी जनतेत रोष वाढेल असे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीचे टेन्शन वाढवले आहे. रविवारी २५ ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी रामदास आठवले यांनी रणशिंग फुंकले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला ऊसधारक शेतकरी हे चिन्ह मिळालेले आहे. इथुन पुढच्या निवडणुका आम्ही ऊसधारक शेतकरी या चिन्हावर लढवणार आहोत. तसंच आम्ही लोकसभेला इतर प्रमुख पक्षांशी जुळवून घेतले परंतु आता विधानसभेला आम्ही जुळवून घेणार नाही आमचा देखील विचार केला पाहिजे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.