बदलापूरमधील आदर्श शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. या घटनेचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले. सगळीकडे या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच बदलापूरमध्ये या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात आंदोलनही करण्यात आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली होती. तसेच आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज पुन्हा अक्षय शिंदेला न्यायालयात हजार करण्यात आले.न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदेच्या कोठडीत आता वाढ केली असून 14 दिवस म्हणजेच 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.बदलापूर प्रकरणावर कल्याण न्यायालयातील न्यायाधीश वी. ए. पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली होती. आरोपी अक्षय शिंदेला आता 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पॉक्सो गुन्ह्यांमधील कलमात ही आता वाढ करण्यात आली आहे. शाळेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, या गुन्ह्यात शाळेच्या अध्यक्ष, मुख्याध्यापक तसेच सेक्रेटरी यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे तर या गुन्ह्यातील तीन आरोपी अद्यापी फरार आहेत. अशी माहिती वकिलांनी दिली आहे.
दुसरीकडे या याप्रकरणी दोन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने बदलापूर मध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाचा प्राथमिक अहवाल सादर केला. तसेच आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर या प्रणालीतील त्रुटींबाबत तपासणी करण्यासाठी आणि पुढील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे.