आगामी विधानसभा निवडणूक दोन-अडीच महिन्यांवर येऊन ठेपलीय आणि त्यामुळं मातब्बर नेत्यांना आव्हान देण्यासाठी महायुती सोबतच महाविकास आघाडी देखील तयारीला लागली आहे. लोकसभेला डॉ. विजयकुमार गावित यांची मुलगी डॉ. हीना गावित यांचा पराभव झाल्यानं आता स्वतः डॉ विजयकुमार गावित यांना देखील यंदाची विधानसभा निवडणूक टफ जाण्याची शक्यता अधिक आहे. १९९५ पासून विधानसभेवर निवडून जात असलेले भाजपचे जेष्ठ नेते व आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना विरोधी पक्षापेक्षा मित्रपक्षाकडून अधिक धोका आहे. त्यांना नेमक्या कोणत्या मित्र पक्षाकडून धोका आहे…? गावित यांच्यासाठी यंदाची निवडणूक धोक्याची का असणार आहे…? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
नंदुरबार विधानसभा मतदारसंघातुन १९९५ पासून डॉ. विजयकुमार गावित हे विधानसभेवर निवडून जात आहेत. या मतदारसंघावर कायमच गावित यांचा राजकीय दबदबा राहिला आहे. १९९५ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यांनतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ ते २००९ पर्यंत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली व तेव्हाही ते विजयी झाले. राज्यात मंत्री झाले. त्यांची मुलगी डॉ. हीना गावित यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवली आणि जिंकली. त्यानंतर डॉ. विजयकुमार गावित यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. गावित यांचा त्यांच्या मतदार संघासोबतच जिल्ह्यातील आजूबाजूच्या आदिवासी भागात प्रभाव आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर १० वर्ष काँग्रेसचा गड राहिलेल्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघात भाजपने गावित यांच्या साथीने मुसंडी मारली होती.