आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शाह मुंबईत आल्यानं राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी नुकतीच सह्याद्री अतिथिगृहावर महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यातील भाजपा नेत्यांकडून तयार करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा त्यांनी घेतला. भाजपानं 150 जागा लढवून किमान 125 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवावं अशा सूचना शहांनी भाजप नेत्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. पण भाजपला किती जागा जिंकण्याची खात्री आहे. ज्या जागा जिकंण्याची खात्री नाही त्या जागांवरचा हट्ट सोडला जाणार का? कोअर कमिटीच्या बैठकीत नेमकी काय खलबतं झाली? भाजपचं नवं महाराष्ट्र मिशन काय आहे? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..
येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीप्रमाणेच फॉर्म्युला वापरण्यात येणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. विधानसभेला भाजपने 125 जागांचं मिशन ठेवलं आहे. यातील जवळपास 50 जागांवर निश्चित विजय होईल असा विश्वास भाजपला आहे. तर उर्वरित ७५ जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. कोअर कमिटीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ‘मिशन १२५’ला अंतिम स्वरूप दिलं जात आहे. या बैठकीत कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीत मतभेद झाले तरीसुद्धा महायुती अभेद्य ठेवून निवडणुकीला सामोरं जाण्याच्या सूचना अमित शहांनी दिल्या आहेत. जागा वाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. किमान 150 जागांवर भाजपानं निवडणुका लढवाव्यात आणि त्यातील 125 जागा जिंकाव्यात अशी रणनीती आखण्यात यावी. महायुतीच्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी 100 जागांवर विजय संपादित करावा. त्यासाठी महायुती म्हणून भाजपानं त्यांना सर्व प्रकारचं सहकार्य करावं असंही या बैठकीत ठरल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या काही चुका झाल्या आहेत, त्याची पुनरावृत्ती विधानसभेमध्ये टाळावी, याकडं कटाक्षानं लक्ष देण्याच्या सूचनाही अमित शहांनी केल्या आहेत. तब्बल दोन तासापेक्षा अधिक काळ भाजपा कोअर कमिटीची बैठक चालू होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह इतर मंत्री आणि नेते उपस्थित होते.