महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. तर भाजपला मोठा झटका बसला. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष जोरदार रणनीती आखत आहेत. लोकसभेला राज्यात सर्वाधिक जागा जिंकून मोठा भाऊ ठरलेला काँग्रेस देखील विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसून आहे. राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसने ‘मेगा प्लॅन’ तयार केला आहे. या प्लॅननुसार काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या महाराष्ट्रात सभा होणार आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांचंही महाराष्ट्रावर लक्ष असणार असल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभांचा महाराष्ट्रात सभा होणार आहेत. राज्यात या दोन्ही नेत्यांच्या 15 ते 20 सभा होणार आहेत. दोन्ही नेते प्रत्येक विभागात सभा घेणार आहेत. यासह काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांच्या देखील सभा होणार आहेत. सभांच्या अनुषंगाने राज्यातील नेत्यांनी केंद्राला आज सविस्तर माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या आजच्या बैठकीची माहिती दिली. आज वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी राज्यातील परिस्थितीबाबतची चर्चा करून सर्व माहिती दिली. आघाडी संदर्भातही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात आली आहे. आता 23 सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे जिल्ह्याची बैठक होणार आहे. या बैठकीत आम्ही जिल्हानिहाय आढावा घेणार आहोत, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.चंद्रपुरातील वादावरही त्यांनी भाष्य केलं. या वादावर काही चर्चा झाली नाही. हा वाद केवळ गैरसमजातून झालेला आहे. आता आम्ही त्यावर पडदा टाकला आहे, असंही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. आता काँग्रेसच्या मेगा प्लॅननुसार काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या महाराष्ट्रात अनेक सभा होऊ शकतात. परंतु या सभांचा काँग्रेस आणि महाविकास आघाडीला फायदा होणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरेल.