विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्याआधी आमच्या मागण्या मान्य करण्याची सरकारला ही शेवटची संधी असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय. म्हणजे निवडणूक घोषित होईपर्यंत मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू राहण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा व्हायला अगदी काही दिवसच बाकी आहे. आणि त्या आधी जरांगे पाटलांनी उपोषणाचं अस्त्र उगारून महायुती सरकारचं टेन्शन वाढवलं आहे. आरक्षण नाही तर पाडापाडी होणार असा इशाराच जरांगेंनी सरकारला दिला आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मनोज जरांगे फॅक्टर हा गेमचेंजर ठरण्याची शक्यता दिसतेय. पण हा फॅक्टर लोकसभेइतकाच परिणामकारक असेल की त्याची तीव्रता कमी होईल? याचा नेमका कोणाला फटका बसेल? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगेंनी जो उपोषणाचा डाव टाकलाय यात त्यांना किती यश येणार ? कोणाचं राजकीय समीकरण बिघडणार? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..
राज्यात मराठा आरक्षणासाठी इरीला पेटलेले मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषणाला बसलेत. उपोषण, रॅली, सभा,आंदोलनं करूनही सरकार दाद देत नसल्यानं विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर असताना जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. यात गेल्या सहा महिन्यांपासून मनोज जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळांना टार्गेट करताना पाहायला मिळतायत… त्यातून मराठा-ओबीसी अशी दरी निर्माण झाली आहे. आता पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसल्यावर जरांगेनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा नाही तर २०२४ ला राजकीय करिअर उध्वस्त करून टाकेल अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांना पुन्हा इशारा दिलाय. मराठा, धनगर, मुस्लिमांसह शेतकऱ्यांना हे सरकार वेड्यात काढतंय असं सांगत आमच्या मागण्या मान्य करा अशा शब्दांत जरांगेंनी फडणवीसांवर संताप व्यक्त केलाय. मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा, या मुख्य मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आपल्या आमरण उपोषणावर ठाम आहेत. मराठा हे कुणबी असून त्यांच्या नोंदीनुसार सगेसोयऱ्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. तर याआधी जरांगेंनी सरकारला निवडणुकीत पाडण्याचा इशारा दिला आहे. मात्र निवडणुकीत उतरू नये असं वाटत असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या मान्य कराव्या असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. जरांगेंच्या सर्वाधिक निशाण्यावर देवेंद्र फडणवीस दिसून येतात. महायुतीचे ११३ आमदार विधानसभा निवडणुकीत पाडणार असल्याचं त्यांनी यापूर्वीच म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा १५ दिवसांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर उपोषणाला बसून जरांगेंनी महायुती सरकारची डोकेदुखी वाढवली आहे.