नऊ दिवस विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
पुणे | माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट च्या वतीने गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा मंदिरात आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवास आजपासून शुभारंभ झाला. ढोल-ताश्याच्या गजरात, विधिवत पूजा करून आशापुरात माता मंदिरात घटस्थापना करण्यात आली. पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येनं येत आशापुरा माताचा आशिर्वाद घेतला.विविधरंगी फुलांच्या सजावटीनं मंदिर सजविण्यात आले आहे. नवरात्र उत्सवामुळे मातेच्या मूर्तीची सुंदर सजावट केली होती. आजच्या घटस्थापनेवेळी माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे प्रमुख व जीतो अॅपेक्स इंटरनॅशनलचे अध्यक्ष विजय भंडारी व ट्रस्टचे चेतन भंडारी, विमलबाई भंडारी, भारती भंडारी, लीना भंडारी, प्रसिद्ध उद्योजक राजेश सांकला, जीतो पुणेचे अध्यक्ष इंदर छाजेड, मनोज छाजेड, श्याम खंडेलवाल, जिनेंद्र लोढा, राजेंद्र गोयल, दिनेश ओसवाल, दिलीप मुनोत, मंगेश कटारिया, सचिन जैन आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवरात्र उत्सवाच्या या नऊ दिवसांमध्ये अभिषेक, आरती, नवचंडी महायज्ञ, माता की चौकी, भजन, श्री सुक्त पठण, कन्यापूजन, नवदुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा, श्री देवी सूक्तम् मंत्र सामूहिक पठण, आदी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यावेळी फ्लॅश मॉबचे आयोजन देखील करण्यात आले आहे. तसेच नवरात्र उत्सवामध्ये सकाळी ६.३० वाजता आरती होणार असून ७ ते ९ च्या दरम्यान अभिषेक होणार आहेत. नवचंडी महायज्ञ दुपारी ४ ते सायंकाळी ७ पर्यंत होणार आहे. सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार असून त्यानंतर देवीचे भजन, देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम माता की चौकी होणार आहे. तसेच, विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या कर्तृत्ववान महिलांना नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच, कन्यापूजन करण्यात येणार आहे. महिला सशक्तीकरण विषयी चर्चासत्राचे आयोजन देखील करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष विजय भंडारी यांनी दिली. माँ आशापुरा ही राजस्थानमधील अनेकांची कुलदेवता आहे. महाराष्ट्रात आशापुरा मातेचे मंदिर नसल्याने पुणे आणि परिसराबरोबरच महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या परंतु, मूळच्या राजस्थानमधील लोकांना लग्न कार्यानंतर अथवा इतर धार्मिक कार्यक्रमासाठी राजस्थानमध्ये जावे लागत असे. नागरिकांना इथेच आशापुरा मातेचे दर्शन घेता यावे म्हणून विजय भंडारी आणि परिवाराने गंगाधाम चौकाजवळ माँ आशापुरा मातेचे भव्य मंदिर बांधले. याठिकाणी होत असलेला नवरात्र उत्सवदेखील खूप वेगळ्या स्वरुपाचा आणि समाजाला दिशा देणारा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात याठिकाणी दर्शनासाठी येतात.
सेवा सप्ताहाचे आयोजन
माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त ‘नवरात्र सेवा सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले आहे. ३ ते १० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत हा सेवा सप्ताह साजरा केला जाणार असून यादरम्यान अन्नदान, कॉम्प्युटर रिसायकलिंग, हेल्थ मेडिकल कॅम्प, शेड अॅक्टिव्हिटी, शिलाई मशीनचे वाटप, सर्व्हायकल कॅन्सर अॅक्टिव्हिटी, सायन्स लॅब्रोटरी तसेच गरजूंसाठी पाण्याच्या टाकीचे वितरण असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. ३ ऑक्टोबर रोजी ९० कुष्ठरुग्ण कुटुंबांना अन्नदान, ४ ऑक्टोबर रोजी पुणे महापालिकेच्या हडपसर येथील शाळेला पाच तर ऑस्करवाडी येथील शाळेला एक कॉम्प्युटर भेट देणार, ५ ऑक्टोबर रोजी वाड्यावस्त्यांवरील कुटुंबांसाठी व त्यांच्या मुलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन, ६ ऑक्टोबर रोजी ऑस्करवाडी येथील प्राथमिक विद्यालयात शेड ऍक्टिव्हिटी राबवली जाणार, ७ ऑक्टोबर रोजी समाजातील उपेक्षित, आर्थिक लाभापासून वंचित असलेल्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत म्हणून ९ शिलाई मशीनचे वाटप, ८ ऑक्टोबर रोजी महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम, ९ ऑक्टोबर रोजी पिसोळीमधील शाळेसाठी विविध विज्ञान प्रयोगशाळा उपकरणे व पुस्तकांचे वाटप, १० ऑक्टोबर रोजी वृद्धाश्रम आणि शाळेमध्ये १० पाण्याच्या टाक्यांचे वाटप आदी उपक्रम या सेवा सप्ताहा दरम्यान राबविले जाणार आहेत.
सेवा हे व्रत; नवरात्रीमध्ये त्याला विशेष महत्त्व!
भारतीय संस्कृतीमध्ये सेवेला विशेष महत्त्व आहे. खासकरून नवरात्र उत्सवामध्ये केलेल्या सेवेला विशेष स्थान आहे. यामुळेच आशापूरा माता मंदिर ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड च्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवात माता-भगिनींचा सन्मान करण्याची संधी आपल्याला मिळते. या अनुषंगाने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्वान महिलांना नवदुर्गा सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. आपण या नवरात्र उत्सवात माता-भगिनींचा सन्मान करण्यासाठी आणि आशापुरा मातेचा आशिर्वाद घेण्यासाठी आवर्जून या.
- विजय भंडारी (अध्यक्ष, माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट)