पुणे | माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट च्या वतीने गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा मंदिरात नवरात्र उत्सव सुरु आहे. या नवरात्र उत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी श्री देवीसूक्तम मंत्राचे सामुहिक पठण करण्यात आले. यासोबतच माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट व लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड च्या वतीने नवरात्र उत्सवात राबविण्यात येत असलेल्या सेवा सप्ताह अंतर्गत आज विविध गरजू शाळांना ७ रिसायकल्ड संगणक भेट म्हणून देण्यात आले. नवरात्र उत्सवात आज हिरवा रंग होता. त्यामुळे सर्व महिला हिरव्या रंगाची साडी घालून या श्री देवीसूक्तम मंत्र पठणाच्या कार्यक्रमास उपस्थित होत्या. यावेळी भारती भंडारी, लीना भंडारी, रुपाली चोरडीया, अचला भंडारी, आरती सरनोत, रेखा खंडेलवाल, शिल्पा कटारिया, सुजाता गोयल, पूनम ओसवाल, किरण खंडेलवाल, स्वाती पोद्दार आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.
या नवरात्र उत्सवात अभिषेक, आरती, नवचंडी महायज्ञ, माता की चौकी, भजन, श्री सुक्त पठण, कन्यापूजन, नवदुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा, श्री देवी सूक्तम् मंत्र सामूहिक पठण, आदी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. माँ आशापुरा ही राजस्थानमधील अनेकांची कुलदेवता आहे. महाराष्ट्रात आशापुरा मातेचे मंदिर नसल्याने पुणे आणि परिसराबरोबरच महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या परंतु, मूळच्या राजस्थानमधील लोकांना लग्न कार्यानंतर अथवा इतर धार्मिक कार्यक्रमासाठी राजस्थानमध्ये जावे लागत असे. नागरिकांना इथेच आशापुरा मातेचे दर्शन घेता यावे म्हणून विजय भंडारी आणि परिवाराने गंगाधाम चौकाजवळ माँ आशापुरा मातेचे भव्य मंदिर बांधले. याठिकाणी होत असलेला नवरात्र उत्सवदेखील खूप वेगळ्या स्वरुपाचा आणि समाजाला दिशा देणारा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात याठिकाणी दर्शनासाठी येतात.
सेवा सप्ताहाचे आयोजन
माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त ‘नवरात्र सेवा सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण नवरात्र उत्सवामध्ये हा सेवा सप्ताह साजरा केला जाणार आहे. आता उर्वरीत दिवसांमध्ये म्हणजे ५ ऑक्टोबर रोजी वाड्यावस्त्यांवरील कुटुंबांसाठी व त्यांच्या मुलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन, ६ ऑक्टोबर रोजी ऑस्करवाडी येथील प्राथमिक विद्यालयात शेड ऍक्टिव्हिटी राबवली जाणार, ७ ऑक्टोबर रोजी समाजातील उपेक्षित, आर्थिक लाभापासून वंचित असलेल्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत म्हणून ९ शिलाई मशीनचे वाटप, ८ ऑक्टोबर रोजी महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम, ९ ऑक्टोबर रोजी पिसोळीमधील शाळेसाठी विविध विज्ञान प्रयोगशाळा उपकरणे व पुस्तकांचे वाटप, १० ऑक्टोबर रोजी वृद्धाश्रम आणि शाळेमध्ये १० पाण्याच्या टाक्यांचे वाटप आदी उपक्रम या सेवा सप्ताहा दरम्यान राबविले जाणार आहेत.