राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच इच्छुक उमेदवारांनी आपल्यालाच तिकीट मिळावं यासाठी पक्षाकडे फिल्डिंग लावली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा एक दावे अनेक अशी स्थिती राज्यातल्या जवळपास सगळ्याच विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणूक ही दिवाळीनंतर होणार असल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अजूनही पूर्ण झालेलं नाही. यामुळे दोन्हीकडे इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अशीच परिस्थिती पुणे जिल्ह्यातील पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात महायुतीसोबतच महाविकास आघाडीत पाहायला मिळतेय. दोन्ही बाजुला अनेकांनी उमेदवारीवर दावा करायला सुरवात केली आहे. हा मतदार संघ पुणे शहराला लागून आहे त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतून देखील इच्छुकांची संख्या जास्त आहे. यामुळे जागावाटपावेळी महायुतीसोबतच महाविकास आघाडीच्या देखील नाकी नऊ येणार आहेत.. आता पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कोण कोण नेते इच्छुक आहेत..? मतदारसंघात नेमकी राजकीय परिस्थिती काय आहे..? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संजय जगताप हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे जागावाटपावेळी हा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचं बोललं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संजय जगताप पुन्हा एकदा इच्छुक आहेत. त्यांनी मतदारसंघात प्रचाराला देखील सुरवात केली आहे. महाविकास आघाडी आणि काँग्रेसकडून संजय जगतापांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून ३५ हजारांचं मताधिक्य मिळालं होत. त्यामुळे या मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक आहे. आता या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार असला आणि हा मतदारसंघ जागावाटपात काँग्रेसकडे जरी गेला तरी या मतदारसंघावर महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दावा केला जात आहे. शरद पवार गटातून माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांनी मतदारसंघात तयारी केल्याची चर्चा आहे. यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावेळी वाद होईल. दुसरीकडं महायुतीत देखील काही वेगळी परिस्थिती बघायला मिळत नाही. महायुतीत शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी देखील शिवतारे चर्चेचा विषय बनले होते. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शिवतारे इच्छुक होते. महायुतीमधून लोकसभेला उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत होते. त्यावेळी त्यांनी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला त्यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे लोकसभेच्या जागावाटपावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात नाराजीचे सूर पाहायला मिळाले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंची समजूत काढत त्यांना माघार घायला लावत विधानसभेला उमेदवारी देऊ असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमधून शिवसेनेचे विजय शिवतारे हे काहीही झाल्यास माघार घेणार नसल्याचं चित्र यावरून स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे महायुतीत भाजपने देखील या मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. भाजपचे जालिंदर कामठे, माजी आमदार अशोक टेकवडे, बाबाराजे जाधवराव, गंगाराम जगदाळे हे देखील आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. शिवसेना आणि भाजपसोबत अजित दादा गट देखील काही मागे नाही. अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांचं देखील नाव निवडणुकीच्या रेसमध्ये आहे. आता इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरीचं प्रमाण सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. पक्षाकडून तिकीट मिळालं नाही तर इच्छुक उमेदवारांच्या बंडखोरीचा फटका कोणाला बसतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.