पुणे | स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांच्या खासदार निधीतून दिल्या गेलेल्या फंडातून साकारलेल्या द पूना गुजराती केळवणी मंडळाच्या एच व्ही. देसाई कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील आद्ययावत व्यायाम शाळेचे औपचारिक उद्घाटन गौरव बापट यांचे हस्ते झाले.यावेळी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेचे अध्यक्ष राजेश शाह, सचिव हेमंत मणियार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव, दिलीप जगड, संदीप शाह, विनोद देढीया, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना राजेश शाह म्हणाले की, ‘दिलेल्या शब्दाला जागणारा’ आणि ‘माणसांतील माणूस’ म्हणजे पुण्याचे माजी खासदार गिरीश बापट होते. १९९५ मध्ये प्रथम आमदार झाल्यानंतर गिरीश बापट यांचा मोठा सन्मान स्वर्गीय रतन टाटा यांनी कंपनीमध्ये बोलवून केला. त्याचे कारण म्हणजे लोकप्रतिनिधी होण्यापूर्वी ते टाटांच्या कंपनी मध्ये एक कर्मचारी होते. याविषयी स्वतः टाटांनी त्यांचे कौतुक केले होते व तसे पत्रही दिले होते जे आजतागायत माझ्याकडे आहे असे भावनिक उद्गार त्यांचे चिरंजीव गौरव बापट यांनी काढले.देसाई कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी आपल्या प्रास्ताविकात गिरीश बापट यांच्या वर टाटा समूहात झालेले संस्कार त्यांनी कसे समाजकारणात वापरले व कसबा पेठ परिसरातील शैक्षणिक संस्थांच्या विकासात कसे भरीव योगदान दिले याचा उल्लेख केला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सतीश गोरे यांनी केले आणि आभार प्रदर्शन शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. ऋषी दुबे यांनी केले.