मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होम ग्राऊंड असलेल्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी खेळली आहे. या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोपरी पाचपाखाडीत सेना विरुद्ध सेना असा सामना रंगणार आहे. केदार दिघे यांच्यामुळे एकनाथ शिंदेंना इथं टफ फाईट मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. कारण पाच वर्षातली बदलती राजकीय परिस्थिती. शिवसेना फुटीचा परिणाम. अशा महत्वाच्या कारणांमुळे या निवडणुकीचं वातावरण ही आपल्याला वेगळ पाहायला मिळतंय. सध्या याठिकाणची राजकीय समीकरणं कशी आहेत ? सद्यस्थितीला काय वातावरण आहे ? एकनाथ शिंदेंसाठी होमग्राऊंड कसं आव्हानात्मक ठरू शकतं ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
आनंद दिघे आणि ठाणे हे फार जुनं राजकीय समीकरण आहे. आनंद दिघे यांचं कायम ठाण्यातील राजकारणावर वर्चस्व होतं. त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या राजकारणावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. आजही एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक भाषणात धर्मवीर आनंद दिघे यांचा उल्लेख असतोच. त्यांनी आनंद दिघे यांच्या जिवनावर दोन वर्षात दोन सिनेमे देखील प्रदर्शित केले आहेत. आता उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या केदार दिघेंना एकनाथ शिंदेंविरोधात उतरवलं आहे. ते केदार दिघे आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. आता केदार दिघे यांच्यासाठी ही लढाई सोपी नाही. कारण एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर आहेतच यासह ते या मतदारसंघातून २००४ पासून सलग चार वेळा निवडून आले आहेत. तसेच ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी शिवसेनेचं नेतृत्व केलं आहे. आपण जर ठाण्यातील राजकीय समीकरणं पाहिली तर ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व राहिलं आहे. ठाणे हा सेनेचा गड मानला जातो.. याच ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ आधी ठाणे शहर मतदारसंघात येत होता. २००८ साली झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत कोपरी पाचपाखाडी हा स्वतंत्र मतदारसंघ झाला. तेव्हापासून एकनाथ शिंदेंनी या मतदारसंघाचं नेतृत्त्व केलं.
२००९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून एकनाथ शिंदेनी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मनोज शिंदेंचा 32,776 मतांनी पराभव केला. एकनाथ शिंदेंना 73,502 तर मनोज शिंदेंना 40,726 मतं मिळाली होती. पुढे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी भाजपाच्या संदीप लेले यांचा 51,869 मतांनी पराभव केला. त्यावेळी एकनाथ शिंदेंना 1,00,420 तर संदीप लेले यांना 49,447 मतं मिळाली होती. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय घाडीगावकर उभा होते. या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी 89,300 इतक्या मतांनी संजय घाडीगावकर यांना पराभूत केलं. एकनाथ शिंदेंना 1,13,497 मतं तर संजय घाडीगावकर यांना अवघी 24,197 मतं मिळाली होती. मागच्या तिन्ही निवडणुकांत एकनाथ शिंदे यांच्या मताधिक्क्यात वाढ झाल्याचं दिसून येतंय. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा मोठा समर्थक वर्ग या मतदारसंघात राहतो. त्यामुळे या दोन्ही समर्थकांची मतं मोठ्या प्रमाणात शिवसेनेला मिळत असत. परंतु, आताच्या राजकीय स्थितीनुसार याठिकाणचा मतदारवर्ग विभागला आहे. केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे असल्याने एकनाथ शिंदे यांना आपण गुरू मानत असलेल्या आनंद दिघे यांच्याच कुटुंबातील सदस्याविरोधात निवडणूक लढवावी लागत आहे.