महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गजांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जाणाऱ्या बाळासाहेब थोरातांचा नवख्या तरुणाने दारुण पराभव केला.. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमोल खताळ हे जायंट किलर ठरले आणि संगमनेरमधील बाळासाहेब थोरातांच्या एकहाती वर्चस्वाला सुरुंग लावला. महाराष्ट्र काँग्रेसचा अनुभवी आणि दिग्गज चेहरा असलेल्या बाळासाहेब थोरातांना संगमेनरकरांनी तब्बल आठ वेळा सलग आमदार होण्याची संधी दिली.. पण यावेळच्या निवडणुकीत मात्र गेम झाला. संगमनेरमध्ये नेमकं काय घडलं? बाळासाहेब थोरातांना संगमनेरकरांनी का नाकारलं ? त्यांना पराभवाची धूळ चारणारे अमोल खताळ नेमके आहेत तरी कोण? लोकसभेला सुजय विखेंचा जो दारुण पराभव झाला आणि तो पराभव होण्यात ज्या बाळासाहेब थोरातांचा महत्वाचा रोल राहिला त्यांचा पराभव करून विखेंनी बदला घेतला. परंतु आता हे बदल्याचं वर्तुळ पूर्ण झालं की, विखे-थोरात संघर्ष टोकाला पोहोचणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आपला पहिला प्रश्न संगमेरमध्ये नेमकं काय घडलं ? तर निकालाच्या दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी सुरु झाल्यानंतर अगदी सुरुवातीपासूनच बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर होते आणि अखेर १०,५६० मतांच्या फरकाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांना पराभूत केलं. अमोल खताळ यांना १,१२,३८६ मतं मिळाली तर बाळासाहेब थोरातांना १,०१,८२६ मतं मिळाली. बाळासाहेब थोरातांनी संगमनेरमधून आतापर्यंत आठ वेळा निवडणूक लढवली. १९८५ पासून २०१९ पर्यंत सलग आठ वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. मात्र नवव्या वेळी या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. थोरात यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं की काँग्रेससह महाविकास आघाडीला १८० जागा मिळाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. मात्र हे म्हणणाऱ्या थोरातांना आपला बालेकिल्ला राखता आला नाही. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास ते मुख्यमंत्रिपदाचेही प्रमुख दावेदार मानले जात होते. शांत आणि संयमी नेते पण राजकारणात मुत्सदीगिरी करणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. पण त्यांचा पराभव हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो आहे. खरं तर बाळासाहेब थोरातांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघावर प्रचंड प्रभाव होता. मजबूत पकड होती. संगमनेरमधील सर्व सहकारी संस्था थोरात यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे एवढी मोठी प्रचार यंत्रणा असतानाही थोरातांना संगमनेरकरांनी का नाकारलं ? त्यांच्या पराभवाची कारणं नेमकी काय याच्यावर एक नजर टाकल्यास राजकीय जाणकारांच्या मते,बाळासाहेब थोरात सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालवतात. पण या निकालाकडे बघितलं, तर ज्या ज्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांमध्ये पदांचं वाटप केलं आहे, कुटुंबीयांना सत्तेचा मोठा वाटा दिला आहे, त्यातील अनेक दिग्गज पराभूत झाले आहेत. मतदारसंघावर एकहाती प्रभाव असला की, कधी कधी राजकीय नेत्यांमध्ये गाफिलपणाही येतो. त्या गाफिलपणाचा बाळासाहेब थोरातांना फटका बसला आहे