महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे आता देशाचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा देण्यात आला आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात यावं अशा मागणीने जोर धरला होता. मात्र, अजितदादांच्या फडणवीसांच्या नावाला मिळालेल्या पाठिंब्यामुळं एकनाथ शिंदे यांची पॉवर घटली तर, नाही ना? म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. भाजपने ठेवलेल्या प्रस्तावांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. परंतु, यावर आता शिंदेंनीच स्पष्टीकरण दिल्यामुळं ते नाराज असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसनं आपापले गटनेते निवडले आहेत परंतु, अद्याप भाजपानं त्यांचा गटनेता न निवडल्यानं मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी चिन्ह आहेत. राज्यात मुख्यमंत्रीपदावरून नेमकं काय चाललंय हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस प्रबळ दावेदार मानले जात आहेत. अशातच मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तुम्हाला वाटत असेल कुठे घोडं अडलं. मी मोकळा माणूस आहे. मी धरून ठेवणं, ताणून ठेवणं असा माणूस नाही. जो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह घेतील तो आम्हाला मान्य आहे, असं शिंदेंनी म्हटलं. त्यानंतर आता भाजपाचा मुख्यमंत्री होणार असे संकेत दिसू लागले आहेत. मी लाडका भाऊ हे पद मिळवलं आहे. ही मोठी ओळख आहे. मी मोदींना फोन केला होता. मी त्यांना सांगितलं सरकार बनवताना निर्णय घेताना मी कुठलीही अडचण आणणार नाही. मला अडीच वर्ष संधी दिली. आता तुम्ही निर्णय घ्या, तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल. एनडीए आणि महायुतीचे प्रमुख म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय अंतिम असेल. निर्णय घेताना माझी अडचण आहे असं वाटू देऊ नका. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. मला मान्य असेल, असं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना फोनवरून हे सांगितलं असल्यातं शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.