महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. या धक्क्यातून महाविकास आघाडी अजून सावरलेली नाही. एकीकडे आपला पराभव हा ईव्हीएममुळे झाल्याचा दावा महाविकास आघाडीतील नेते करत असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवरील मतभेद समोर येत आहेत. सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये झालेले मतभेद हे राज्यभर चर्चेत आले होते. काँगेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील एकूण ११ विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसने सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिणमध्ये अपक्षाला पाठिंबा दिला आणि पंढरपूर या जागा लढवल्या. मात्र तिन्ही जागांवर काँग्रेसचा पराभव झाला. सोलापूर मध्य मतदारसंघ शिंदे कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जातो. त्याच सोलापूर मध्य मतदारसंघामध्ये उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं आहे. सोलापूर दक्षिणमध्ये सुद्धा ज्या अपक्षाला पाठिंबा दिला त्याचं सुद्धा डिपॉझिट जप्त झालं. पंढरपूरमधून देखील भगीरथ भालके पराभूत झाले. शरद पवार गटाच्या अनिल सावंत यांच्या बंडखोरीचा मोठा फटका भालकेंना बसला. जितक्या मतांनी भगीरथ भालके पराभूत झाले त्याच मतांच्या आसपास मतं अनिल सावंत यांनी मिळवली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कुरघोडींमध्ये या जागा पडल्या असल्याचं बोललं जात आहे. सोलापुरात प्रणिती शिंदे यांच्यामुळेच महाविकास आघाडीचा पराभव झाला असा आरोप ठाकरे गटासह शरद पवार गटाकडून ही करण्यात आलाय. सोलापुरात काँग्रेसनं लढवलेल्या तीन जागांवर नेमकं काय घडलं ? प्रणिती शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून रोष का व्यक्त करण्यात येतोय ? याची नेमकी कारणं काय ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तर काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र ऐनवेळेस काँग्रेसने दिलीप माने यांना एबी फॉर्म दिला नाही. एबी फॉर्म मिळाला नसला तरी दिलीप माने आणि काँग्रेसचे नेते धर्मराज काडादी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी प्रणिती शिंदे स्वतः उपस्थित असताना दिलीप माने यांनी अर्ज माघारी घेतला परंतु धर्मराज काडादी यांनी आपला अपक्ष अर्ज कायम ठेवला. ऐनवेळी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद निर्माण झाला. निकालानंतर सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी पाठिंबा जाहीर केलेल्या धर्मराज काडादी यांचं डिपॉजिट देखील जप्त झालं. ठाकरे गटाच्या अमर पाटील यांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी स्पष्टपणे आणि जाहीरपणे खासदार प्रणिती शिंदेंवर गंभीर आरोप करत महाविकास आघाडीच्या पराभवाला सर्वस्वी प्रणिती शिंदे जबाबदार असल्याचं म्हटलंय. सोलापूर दक्षिण मतदार संघात प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेनी जाणूनबुजून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना शेवटच्या क्षणी पाठिंबा दिला. प्रणिती शिंदेंना महाविकास आघाडीच्या उमेदवाराऐवजी अपक्षाला पाठिंबा द्यायचा होता तर त्यांनी पंधरा दिवसांअगोदर पाठिंबा द्यायला पाहिजे होता. खासदार म्हणून त्यांची जबाबदारी होती त्यांनी ती जबाबदारी हाताळली नाही. समन्वय ठेवला नाही त्यामुळे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्याचं प्रशांत बाबर म्हणालेत.