मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या दिवशी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राणे यांनी हा गंभीर आरोप केलाय.
उद्धव ठाकरे हे लबाड लांगडे आहेत. कारण ते खूप खोटं बोलतात. उद्धव ठाकरे यांनीच सदा सरवणकर यांना मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करायला सांगितलं होतं. शिवाय मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती. परंतु, आज मी जिवंत आहे, कोणीच मला मारू शकलं नाही. उद्धव ठाकरे यांना मी पुरून उरेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मर्यादा राखावी. उद्या कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार उद्धव ठाकरे असतील. आम्ही आमच्या नेत्यांना बोललेलं खपवून घेणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला.
नारायण राणे यांनी दसरा मेळाव्यावरून देखील घणाघाती टीका केली. “यावेळचा शिवाजी पार्कचा दसरा मेळावा म्हणजे तमाशा पद्धतीचा मेळावा होता. उद्धव ठाकरे बोलायला लागल्यानंतर लोक उठून गेले. शिवसेनेचा मेळावा शिमग्यासारखा झाला. कारण शिमग्याला शिव्या द्यायचं काम होतं तसचं चित्र पवित्र शिवतीर्थावर पाहिला मिळालं. उद्धव ठाकरे यांनी शिव्या शाप देण्यासाठी मेळावा घेतला होता काय, असं चित्र होतं. केवळ शिव्या देण्याचं काम त्यानीं केलं. बाळासाहेबांच्या विचारांतून प्रेरणा मिळत होती. त्यातून आमची जडणघडण झाली. त्यामुळेच इथपर्यंत पोहचलो. आताचे विचार पाहिलं तर त्यांना दुसरं काही येतं की नाही माहिती नाही, अशी टीका नारायण यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसासाठी काय केलं असा प्रश्न यावेळी नारायण राणे यांनी उपस्थित केला. ‘मराठी माणसांसाठी यांनी काय केलं. केलं असतं तर मेळाव्यातून शिव्या देण्यापेक्षा अडीच वर्षात केलेली कामे सांगितली असती. आपण कोण आहोत याची ठाकरेंना जाणीव करून दिली पाहिजे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.