पुणे | शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी कृषी विभाग कार्यालयात राडा घालत अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली होती. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना धारेवर धरले आहे. ‘सरकारला १०० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. नव्याचे ९ दिवस असतात हे मान्य. पण लोकप्रतिनिधींना कशा पद्धतीने वागायचं याचं तारतम्य राहिलेलं नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
पुण्यात पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. संतोष बांगर यांनी कृषी विभागात जाऊन अधिकाऱ्यांना खडसावले होते. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना ‘तुमच्या बापाची पेंड आहे का? किती वाजता आला? तुमची वाट बघायला आम्ही काय तुमच्या बापाचे नोकर आहोत का? कानाखाली आवाज काढल्यानंतर तुम्हाला समजेल, असे विधान केले होते. त्यानंतर अजित पवार यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘सत्ताधाऱ्यांमधील लोकप्रतिनिधींना वागण्याचं तारतम्य राहिलेलं नाही. सरकारला १०० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. नव्याचे ९ दिवस असतात हे मान्य. पण लोकप्रतिनिधींना कशा पद्धतीने वागायचं याचं तारतम्य राहिलेलं नाही.
दरम्यान, भरतीच्या नुसत्या घोषणा सुरू आहेत. तरुण-तरुणी आशेनं त्या विभागाच्या मंत्र्यांना फोन करतात. पण त्यांची फोनवर ही भाषा आहे. यासाठी त्यांना मंत्री केलंय का? याचंही उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी विचारणा केली.