पुणे | परतीच्या पावसाने राज्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील रस्ते जलमय झाले. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. राज्यातल्या जनतेकडे या सरकारचं साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अजित पवारांनी केला.
सरकारने दिवाळीमध्ये १०० रुपयांत तेल, रवा, डाळी देऊन सामान्यांची दिवाळी गोड करणार असे सांगितले होते. त्याचं ५१३ कोटी रुपयांचं कंत्राटही दिलं पण अजूनही काही हालचाल दिसत नाही. या योजनेचं नेमकं काय झालं? नेमकं गौडबंगाल काय? असा सवाल पवारांनी उपस्थित केला.
दरम्यान, आज (१८) सकाळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या राज्यात होत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यावर बोलतांना अजित पवार म्हणाले की, पुण्यामध्ये अनेक ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. रस्त्यांवर अजूनही पाणी आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आणखी जोरदार पावसाची शक्यता आहे. सरकारने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला पाहिजे. आवश्यक तिथे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अन्न पुरवण्याची सोय केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सध्या सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष असल्याचा आरोप देखील पवारांनी केला. यावरून शिंदे – फडणवीस सरकारला पवारांनी चांगलाच टोला लगावला आहे.