मुंबई | सध्या ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटांना महाराष्ट्रातून विरोध होत आहे. माजी खासदार संभाजी छत्रपती यांनीदेखील या चित्रपटांना विरोध दर्शवला. त्यांनतर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील आक्रमक झाले आहेत. या चित्रपटांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच कारणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्ह्यातील एका मॉलमधील हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला. परिणामी जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर हर महादेव या चित्रपटाला विरोध म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी ठाण्यात आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना सिनेमागृहातून बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. तर मनसे कार्यकर्ते अविनाश जाधव यांनी राष्ट्रवादीवर चांगलाच निशाणा साधला आहे. आव्हाड यांनी शो बंद केला पण जाधव यांनी शो पुन्हा चालू केला आहे.
याच कारणामुळे आता ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या १४१, १४३, १४६, १४९, ३२३, ५०४, अशा वेगवेगळ्या कलमांतर्गत आव्हाड यांच्यासह त्यांच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवाजी महाराजांच्या मांडीवरती अफजलखान झोपून आहे आणि त्याचा कोथळा फाडला आहे. हे इतिहासात कुठेच नाही असं आव्हाड यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे ‘हर हर महादेव’ चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईचं दृष्य दाखवण्यात आलं असून त्यालाही आव्हाड यांनी विरोध केला आहे. बाजीप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांशी लढायला गेले आहेत. हे कुठे दिसलं? बाजीप्रभूंनी शिवाजी महाराजांशी लढाई केली. बाजीप्रभू शिवाजी महाराजांचा सच्चा सेवक होता अशी भूमिका आव्हाड यांनी घेतली आहे.
दरम्यान, आज कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सध्या १५ ते २० पोलीस कर्मचारी विवियाना मॉल परिसरात तैनात आहेत.
अख्या महाराष्ट्रातून या चित्रपटांना विरोध दर्शवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे हे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे ते आपली भूमिका मांडतील असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे.