मुंबई | ”महाराष्ट्रात भाजपचं मिंधे सरकार आहे. केंद्र सरकारला दोघांच्या संगनमताने महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत. यात कोणाला मुंबई तोडायची तर काहींकडून महाराष्ट्र कुरतडण्याचे काम केले जात आहे”, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
कर्नाटक सरकारकडून सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासह 40 गावांवर दावा केला जात असल्याची बातमी समोर आली आहे. त्यावर संजय राऊत यांनी केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ”राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आजवर सीमाबांधवांच्या कोणत्या प्रश्नांना वाचा फोडली आहे? आता तर सांगलीत जत तालुक्यावर कर्नाटक सरकारने दावा केला आहे. केंद्र सरकारला दोघांच्या संगनमताने महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत”.
दरम्यान, बेळगाव सीमाप्रश्नावरुन राज्यातील सर्व महत्वाच्या नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यानंतर या बैठकीवर संजय राऊत यांनी भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली.