मुंबई | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. दुसऱ्या राज्यातील निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळांची बैठक रद्द केली. आधी प्रकल्प पाठवले आता मंत्रिमंडळ पाठवलं असं आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
मंत्रिमंडळाची बैठक का रद्द झाली तर दुसऱ्या राज्यात प्रचार सुरु आहे. राज्यात ओला दुष्काळ आहे, बेरोजगारी वाढत आहे, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवलेली आहे, पण या मंत्रिमंडळाला आणि खोके सरकारला मंत्रिमंडळ बैठक घेण्यासाठी एक तासही नाही. पहिल्यांदा आमदार पाठवले, मग प्रकल्प पाठवले, आता मंत्रिमंडळ पाठवलं. पण महाराष्ट्रासाठी अर्धा तासही नाही. मंत्रिमंडळ गुजरातमध्ये प्रचारासाठी व्यस्त आहे. दुसऱ्या राज्यात प्रचार करावा याबाबत आक्षेप नाही, पण महाराष्ट्रातही मंत्रिमंडळ बैठक महत्त्वाची आहे. निकष बदलण्यासाठी उपसमितीची बैठक रद्द झाली आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळाने महाराष्ट्रासाठी एक तास जरी दिला तर काही चुकीचं झालं नसतं, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.
आदित्य ठाकरे हे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरुन खाजगी विमानाने बिहारला रवाना झाले आहेत. महाराष्ट्रात आणि देशात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, बिहार दौऱ्यावर बोलताना आदित्य ठाकरे हे तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहे. मुख्य म्हणजे आम्ही एकाच वयाचे आहोत. त्यांचं काम योग्य रितीने चाललेलं आहे. अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते. भेटीत राजकीय भूमिका नाही. अनेक दिवसांपासून आमच्यात फोनवरुन चर्चा सुरु होती. आम्ही सरकारमध्ये असताना ते बिहारमध्ये विरोधात होते. पहिल्यांदाच आमची प्रत्यक्षात भेट होणार आहे. तिसरी आघाडी यावर आता चर्चा करु नका. त्यावर मोठे नेते चर्चा करतील. ही भेट दोन तरुण नेत्यांमधील आहे. असेदेखील आदित्य ठाकरे म्हणाले.
ज्या लालू प्रसाद यादवांनी राम मंदिराचा रथ अडवला होता, त्यांच्याच मुलाला आदित्य ठाकरे भेटत आहेत, अशी टीका होत आहे. ज्यांनी पीडीपीसोबत युती केली होती त्यांनी आमच्यावर टीका करु नये असं प्रत्युत्तर देखील आदित्य ठाकरे यांनी दिलं.