नागपूर | ”सांगलीतील 40 गावांसंदर्भात केलेला दावा फसवा आहे. महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही”, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले. तसेच ”जत तालुक्यातील 40 दुष्काळी गावांनी 2012 मध्ये कर्नाटकात सामीर होण्याचा ठराव मंजूर केला होता. हा ठराव आत्ताचा नाही”, असेही ते म्हणाले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील 40 गावांवर दावा करणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान केले आहे. ते म्हणाले, ”सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढून सीमाभागातील कारवार, बेळगाव, निपाणी ही गावे महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु. आपण एकाच देशात राहतो. त्यामुळे हा शत्रुत्त्वाचा नव्हे तर कायदेशीर वाद आहे. सांगलीतील 40 गावांसंदर्भात केलेला दावा फसवा आहे. महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही”.
…म्हणून बोम्मई यांचे विधान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नासंदर्भात एक बैठक घेतली होती. या बैठकीत सीमाभागातील मराठी बांधवांना कायदेशीर मदत करण्याचे ठरले होते. तसेच त्यांना नवीन योजना आणि सुविधांचा लाभ देण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे आपणही काहीतरी करावे, या उद्देशाने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गावे समावेश करण्याविषयीचे वक्तव्य केले असावे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.