मुंबई | दोन दिवसापूर्वी ‘मविआ’ कडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ हा महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. राऊत यांनी एक ट्वीट करत देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही. असे म्हटले आहे. पण शेअर केलेला व्हिडीओ हा मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. स्वराज्य संघटनांनी राऊतांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं आहे.
परंतु यावरून राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी व्हिडीओ ट्विट केला. पण तो व्हिडीओ कालच्या मोर्चाचा आहे, असं मी कुठं म्हणालो? मी कुठे दावा केलाय? असा सवाल करताना संभाजी छत्रपती तुम्ही कुठे भाजपच्या नादाला लागताय? असा टोला राऊतांनी लगावला आहे.
माझ्यावर टीका करणाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या अपमानावर बोलावं. संभाजी छत्रपती प्रगल्भ नेते आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावरती आपण बोलत आहोत. असेदेखील राऊत म्हटले.
दरम्यान, आपला मोर्चा की तुमचा मोर्चा? आमचा मोर्चा मोठा की तुमचा मोर्चा? सर्व मोर्चे आपलेच आहेत. महाराजांच्या अपमानाच्या विषयावर आपण उभे आहोत ना? त्यावर बोलू. इतकच मी राजेंना आवाहन करतो, असंही ते म्हणाले.