पुणे | कसबा पेठ आणि चिंचवडच्या विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. येत्या २७ फेब्रुवारीला निवडणुका होणार होत्या परंतु आता २७ ऐवजी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तसेच निकाल २ मार्च रोजीच लागणार आहे.
भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे कसबा पेठ आणि चिंचवड या विधानसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. याच जागांवर पोटनिवडणूक घेण्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात या निवडणुकांबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. यामध्ये ही निवडणूक बिनविरोध होण्याचे देखील म्हटले जात होते, परंतु इतर घटक पक्षांनी निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
दरम्यान, बारावीच्या परीक्षेमुळे तारखांमध्ये बदल केला आहे. म्हणूनच एक दिवस आधी निवडणूक होणार आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज्याच्या परंपरेनुसार रिक्त झालेले पद हे त्यांच्या कुटुंबियांना दिले पाहिजे तसेच बाळासाहेबांच्या शिवसेनेचा याला पाठींबा आहे असे सांगितले.