जळगाव | एका कार्यक्रमादरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी विरोधकांच्या गद्दारीच्या आरोपांवर थेट कबुलीच देत, गुलाबराव पाटील गद्दार झाला म्हणतात. मी गद्दार झालो नाही, तर एक मराठा चेहरा शिवसेनेमधून बाहेर जात होता त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
विरोधाला विरोध करायचा पण मतदार संघात काही काम करायचं नाही. बिलखेडे(जळगाव) मध्ये एक शौचालय हे लोक बांधू शकले नाहीत आणि भाषणं ठोकतात, अशी टोलेबाजी देखील पाटील यांनी विरोधकांवर केली.
शरद पवार यांच्याविषयी बोलताना, पवार असे म्हणतात की, एकनाथ शिंदे कोण आहेत? असे म्हणत जर कोणत्याही गोष्टीत तुम्ही जातीवाद करत असाल, तर होय मी एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्याग केला. एक मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली असं तसेच आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो. असेदेखील मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान,उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील असो की शिंदे गटाचे इतर आमदार यांच्यावर गद्दार म्हणून टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या टीका करणाऱ्यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.