मुंबई | रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीवर झालेल्या दुर्घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही 22 जुलैला असणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसाबद्दल कोणीही होर्डिंग, बॅनर लावू नये तसेच जाहिरातीदेखील देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा उद्या वाढदिवस आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते व हितचिंतकांनीही गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करता त्यासाठी खर्च होणारा निधी इर्शाळवाडीसाठी वापरण्यात यावा, असे आवाहनही फडणवीसांनी केले आहे.
तसेच देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस हा भाजपकडून सेवा दिन साजरा करण्यात येणार आहे. फडणवीस यांच्या वाढदिवशी भाजपचे नेते कार्यकर्ते लोकांना सेवा देणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. तसेच इर्शाळवाडी घटनेनेमुळे कुणीही वाढदिवस साजरा करू नये, मोठे होर्डिंग लावू नयेत असे आदेश भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.
तर दुसरीकडे इतर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणा असे आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातल्या मुसळधार पावसात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत इर्शाळवाडीतली 48 पैकी 17 घरं गाडली गेली. या दुर्घटनेत जवळपास 20 घरांचं गंभीर नुकसान झालं असून, उरलेली दहा घरं वाचली आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथकं तासाभरात घटनास्थळी दाखल झाली. पण पाऊस आणि अंधारामुळे बचावकार्य सकाळीच सुरु करावं लागलं. गुरुवारी दिवसभरातही पाऊस आणि जोरदार वाऱ्यानं बचाव पथकाची परीक्षा घेतली. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून 98 जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे.