राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाकडून ४६४४ तलाठी पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तीन आठवडय़ांची मुदत देण्यात आली होती. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ जुलै होती. खुल्या गटात एक हजार तर इतर गटांसाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आले होते. मात्र, उमेदवारांच्या आग्रहास्तव याला एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती.
आता एकूण ११ लाख ५० हजार २६५ अर्ज प्राप्त झाले आहेत. उमेदवारांच्या या अफाट संख्येमुळे दररोज ५० ते ६० हजार उमेदवारांची राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असून ही प्रक्रिया २० दिवस चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परीक्षा ते पदनियुक्ती पर्यंत २०२४ हे वर्ष उजाडण्याचा अंदाज आहे.
अर्जदारास ‘या’ मर्यादा
या परीक्षेला बसण्यासाठी अर्जदार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा आणि त्यास मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षे वयोमर्यादा आहे. मात्र बेरोजगारी आणि चांगल्या संधीच्या अभावी लाखो उच्चशिक्षितही या स्पर्धेत उतरत आहेत.
तलाठी भरतीमध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापन, संगणक शास्त्र, विज्ञान, कला, वाणिज्य आदी शाखांमध्ये पदव्युत्तर पदवीधारकांनीही मोठय़ा प्रमाणात अर्ज केल्याची माहिती आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे. मानधनाबाबत बोलायचं झालं तर रु, 25,500/- ते रु. 81,100/- पर्यंत मासिक वेतन आहे.
थोडक्यात प्रशासनात काम करण्याची इच्छा असणार्या महाराष्ट्राच्या युवांकसाठी ही एक चांगली संधी आहे.