लोकसभा निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मात्र, अनेकांना नाराज करून अखेर प्रत्येक पक्षानं आपापल्या उमेदवारांची घोषणा केली. मात्र, देशभरात काँग्रेसच्या उमेदवारांचं निवडणुकीतून माघार घेण्याचं सत्र सध्या सुरू आहे. पुरी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी पक्षाला लोकसभेचं तिकीट परत केलं आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष आपल्याला निधी देणार नसल्याचं कारण देत सुचरिता मोहंती यांनी निवडणुकीतून माघार घेतलीये.
सुचरिता मोहंती नक्की काय म्हणाल्या?
तिकीट परत केल्यानंतर माध्यमांशी बोलताना काँग्रेस उमेदवार सुचरिता मोहंती म्हणाल्या की, “पक्ष मला निधी देऊ शकला नाही म्हणून मी तिकीट परत केलं आहे. दुसरं कारण म्हणजे 7 विधानसभा मतदारसंघांतील काही जागांवर विजयी उमेदवारांना तिकीट दिलं गेलं नाही. त्याऐवजी, काही कमकुवत उमेदवारांना तिकीट मिळालं त्यामुळं अशा परिस्थितीत मला प्रचार करणंही शक्य वाटत नाही.”
पुढे बोलताना, “जेव्हा मी माझं तिकीट परत केला तेव्हा मला पक्षाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. पक्षाकडून मला निधी मिळू शकत नाही त्यामुळं मी स्वतःचं माझा निधी उभारायला मला सांगितलं गेलं. याशिवाय माझं पक्षश्रेष्ठींशी विशेष बोलणं झालेलं नाही. केवळ विधानसभेच्या जागांवर चांगले उमेदवार द्या अशी मागणी मी केली. पण त्याचीही पक्षानं दखल घेतलेली नाही. मला दुसऱ्या पक्षांबाबत माहिती नाही. पण जेव्हा त्यांच्याकडं कोणी तिकीट मागतं तेव्हा ते देताना अतिशय लोकशाही पद्धतीनं आणि केंद्रीय नेतृत्वाकडून लक्ष घालून दिलं जातं, असं म्हणत मोहंती यांनी थेट काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवरही ताशेरे ओढले.
या परिस्थितीला भाजप जबाबदार
“यंदा काँग्रेसची स्थिती वेगळी आहे कारण भाजप सरकारनं काँग्रेसच्या सर्व प्रकारच्या निधीवर निर्बंध आणले अकाऊंट्स फ्रीज केले. एकूणच भाजप सरकारला काँग्रेसनं चांगल्याप्रकारे प्रचार करता येऊ नये यासाठी ही खेळी केली आहे. त्यामुळं पक्ष आपल्या उमेदवारांना निधी देण्यास असमर्थ आहे.मी माझ्या प्रचारासाठी कोणी निधी देतंय का? यासाठी प्रयत्न केले पण ते होऊ शकलं नाही. त्यामुळं दिवस कमी असताना हे सर्व घडवून आणणं कठीण आहे. मला साध्या पद्धतीनं प्रचारच करावा लागला असता पण वेळ कमी असल्यानं आता हे सर्वकाही शक्य नाही.” असं म्हणत या सगळ्या परिस्थितीला केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी मोहंती यांनी केला. त्यामुळेच आता अगदी मतदानाच्या तोंडावर आणखी एका उमेदवाराने माघार घेतल्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.