लोकसभा निवडणुकीतील मतदान आता शेवटच्या टप्प्यांत आलं आहे. 1 जून रोजी देशात सातव्या टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यापूर्वीच आता काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. देशात इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल आणि निकालानंतर पुढील 48 तासांत पंतप्रधान कोण होणार यावर निर्णय होईल असं जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं आहे. निवडणूक प्रचाराच्या एक दिवस आधी दिलेल्या मुलाखतीत जयराम रमेश यांनी हे विधान केलं आहे.
मुलाखतीत बोलताना जयराम रमेश म्हणाले की, बहुमतानंतर इंडिया आघाडीचं सरकार हे हुकुमशाही नव्हे तर समाजवादी मार्गाने काम करेल. या निवडणुकीत भाजपच्या बाजूने कोणतीही लाट नाही, केवळ पंतप्रधानांचे विष आहे. 20 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि इंडिया आघाडीला स्पष्ट आणि निर्णायक जनादेश मिळेल. मला संख्याबळावर बोलायचे नाही, तर निर्णायक बहुमत मिळेल एवढेच सांगायचे आहे. 272 हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे पण तो निर्णायक नाही. जेव्हा मी निर्णायक जनादेश म्हणतो, तेव्हा माझा अर्थ 272 जागांच्या वरची संख्या आहे. असंही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे या मुलाखतीत बोलताना जयराम रमेश यांनी काँग्रेस काही राज्यांमध्ये सर्वांना आश्चर्याचा धक्का देईल असंही सांगितले. राजस्थान, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये काँग्रेस चांगली कामगिरी करेल आणि महाराष्ट्रात फायदेशीर स्थितीत असेल, असा दावा रमेश यांनी केला. उत्तर प्रदेशातही काँग्रेसला फायदा होईल आणि 2019 मधील भाजपला 62 जागांच्या पुढे जाता येणार नाही, असे ते म्हणाले.