नुकत्याच झालेल्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी लोकसभा मतदार संघातुन भाजपाच्या स्मृती इराणी यांना उमेदवारी मिळाली होती परंतु काँग्रेसच्या किशोरी लाल यांनी स्मृती इराणी यांचा दीड लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव केला. २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव केला होता.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या सरकारच्या मंत्रिमंडळात स्मृती इराणी मंत्री होत्या त्यांना अन्न आणि बालविकास खात्याचे मंत्रिपद देण्यात आले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यामधील वातावरण जोरदार तापले होते. अमेठीऐवजी रायबरेलीतून लढण्याची घोषणा ज्यावेळी राहुल गांधी यांनी केली तेव्हा स्मृती इराणी यांनी राहुल गांधी घाबरून दुसऱ्या मतदारसंघात गेले. रायबरेलीतूनही त्यांना पराभवाची चव चाखावी लागेल अशी टीका केली होती. मात्र खुद्द स्मृती इराणी यांनाच या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.पराभव झाल्याने त्यांना दिल्लीतील सरकारी बंगला सोडावा लागला. काँग्रेसच्या काही खासदारांनी यावरून टीका केली होती तर काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही स्मृती इराणी यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं.
लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांचा पराभव झाल्याने त्या आता लोकसभेच्या सदस्य नाहीत त्यामुळे शासकीय नियमाप्रमाणे त्यांना बंगला रिकामा करावा लागला. दिल्लीतील लुटियन्स भागातील २८ तुघलक क्रिसेंट येथे त्यांचे अधिकृत निवासस्थान होते. स्मृती इराणी गेल्या १० वर्षापासून ह्या बंगल्यात राहत होत्या. राहता बंगला सोडावा लागला यामुळे सोशल मीडियावर स्मृती इराणी ट्रोल झाल्या होत्या.स्मृती इराणी यांच्यावर होत असलेल्या टीकांवरून राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये त्यांनी स्मृती इराणी यांची बाजू घेतली आहे. राजकारणात जय, पराजय होत असतो. पण, एखाद्याचा अपमान करणे हे दुर्बलांचे लक्षण आहे. लोकांना तुच्छ लेखणे आणि अपमान करणे हे शक्तीचे नव्हे तर दुर्बलतेचे लक्षण आहे असे राहुल गांधींनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा होत आहे.