भारतीय क्रिकेट संघात आजवर अनेक खेळाडूंनी कर्णधार पदाची धूरा सांभाळली. त्यापैकी प्रत्येक कर्णधारानं विशेष विक्रम आपल्या नावावर केले. शिवाय या प्रत्येक खेळाडूंना फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं या सर्व खेळाडूंची वारंवार तुलना केली जाते आणि भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार कोण यावर चर्चा होत असते. मात्र, हाच प्रश्न जेव्हा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीला विचारला त्यावेळी शामीनं या प्रश्नाचं मजेशीर उत्तर दिलंय. भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार कोण? या प्रश्नावर बोलताना मोहम्मद शामी म्हणाला की, ‘अशा प्रश्नांचे उत्तर देणे म्हणजे तुम्ही खेळाडूंची तुलना करत आहात असा त्याचा अर्थ होत. त्यामुळं कोणत्याही एका व्यक्तीला यशस्वी म्हणणे योग्य नाही. कारण ते अनेक गोष्टींवर अवलंबून असते. पण महेंद्रसिंग धोनीबद्दल बोलायचे झाले तर त्याने जे काही साध्य केले आहे ते कोणीही करू शकलेले नाही.’ शामीच्या या उत्तरातून त्यानं अप्रत्यक्षरीत्या धोनी सर्वोत्कृष्ट कर्णधार असल्याचं जाहीर केलं. शामीनं एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना हे उत्तर दिलं आहे. त्यामुळं आता शामीनं दिलेल्या उत्तरानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून शामीचं कौतुक केलं जातंय.
भारतासाठी आजवर अनेक दिग्गज खेळाडूंनी कर्णधार पद भुषवलं आहे. यापैकी कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतानं पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक उंचावला. त्यानंतर सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतानं अनेक नवे विक्रम रचले. त्यानंतर भारती. संघाची धूरा महेंद्रसिंह धोनीच्या खांद्यावर आली आणि भारतानं टी 20 वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यानंतर भारताचा कर्णधार राहिलेल्या विराट कोहलीनं कसोट क्रिकेटमध्ये टीम इंडियाला नावलौकिक मिळवून दिला. पुढे रोहित सर्माच्या नेतृत्वातही भारतानं अनेक विक्रम आपल्या नावावर केले. त्यामुळं या सर्व दिग्गज खेळाडूंमध्ये भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार निवडणं अवघड आहे. मात्र, मोहम्मद शमीनं दिलेल्या उत्तरानं सर्व क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली असल्याचं पहायला मिळतंय.