मुंबई | लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.अनेक नेते इकडून तिकडे तिकडून इकडे येताना व जाताना दिसू लागले आहेत. त्यात आता आणखी एका काँग्रेसच्या बड्या नेत्याची भर पडलीय. एक दोन नव्हे तर तब्बल ४८ वर्ष काँग्रेस बरोबर एकनिष्ठ राहिलेले बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजकीय प्रवास काय राहिला आहे ते दिलेल्या व्हिडीओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
बाबा सिद्दीकी म्हणजे ईफ्तार पार्टीवाले ही त्यांची मोठी ओळख निर्माण झाली आहे. सर्वाधिक सेलेब्रीटी यामध्ये मोठ्या संख्येने येत असतात. अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातलं भांडण मिटवण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी त्याची मोठी चर्चा झाली होती…
नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. काँग्रेसचा राजीनामा देताना तातडीच्या प्रभावाने मी हा राजीनामा दिला आहे. खरंतर मला अनेक गोष्टी बोलायच्या होत्या पण म्हणतात ना काही गोष्टींबाबत शांत राहिलेलं बरं. त्यामुळं मी शांत आहे. मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो अशा आशयाची पोस्ट लिहून सिद्दीकींनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
आता त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. माजी खासदार मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांचे पूत्र व काँग्रेसचे वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडली व अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला राम राम केला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला हा धक्का असल्याचं बोललं जातंय… बाबा सिद्दीकी हे आता मुलापाठोपाठ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाणार आहेत अशा चर्चांना देखील उधाण आलंय…येत्या काळात याविषयीचंही चित्र स्पष्ट होईल…