सध्या दक्षिण आफ्रिकेत अंडर 19 विश्वचषकाची रणधुमाळी सुरू आहे. या स्पर्धेत मंगळवारी 6 फेब्रुवारीला भारतानं उपांत्या सामन्यात होम टीम दक्षिण आफ्रिकेला नमवत अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली. त्यानंतर गुरुवारी 8 फेब्रुवारीला झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानी संघाला धुळ चारत ऑस्ट्रेलियन संघ फायनलमध्ये धडकलाय. त्यामुळं आता अवघ्या 6 महिन्यांच्या आत पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा विश्वचषकाचा अंतिम सामना बघायला मिळणार आहे. त्यामुळंच 19 नोव्हेंबर 2023 रोजी भारताला ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी सध्या भारताच्या युवा ब्रिगेडकडे असल्याचं बोललं जातंय.
सिनिअर लेवलला ऑस्ट्रेलिया ठरली होती किंग
वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये भारताच्या सिनिअर संघ आणि ऑस्ट्रेलियाच्या सिनिअर संघाचा सामना झाला होता. 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना रंगला होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 240 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने चार विकेटच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केले होते. ट्रेविस हेड याने शतकी खेळी केली होती. त्यावेळी भारताचया विश्वविजयाचं स्वप्न भंगलं होतं.
रोहित आर्मीचा बदला घेण्याची सूवर्णसंधी
दरम्यान, आता 11 फेब्रुवारी रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पुन्हा एकदा लढत होत आहे. अंडर 19 च्या या फायनलकडे जगभरातील क्रीडा चाहत्यांचं लक्ष असेल. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत बदला घेण्याची सुवर्णसंधी युवा ब्रिगेडकडे असेल. 2023 च्या पराभवाची सल प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे. युवा भारतीय संघातील कर्णधार उदय सहारन, मुशीर खान, सचिन धास, सौमी पांडे यासारखे खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. भारतीय संघाला विजयाचा दावेदारही म्हटले जातेय. या संपुर्ण अंडर 19 विश्वचषकात भारतीय संघानं एकतर्फी विजय मिळवलाय. त्यामुळंच आता भारताच्या युवा ब्रिगेडचा हा फॉर्म फायनलमध्येही कायम राहिल अशी भारतीय क्रिकेट चाहते प्रार्थना करतायेत.