पुणे | क्षेत्र कोणतंही असो… तिथं महिलेचं योगदान हे अमूल्य असतं. अगदी ऐतिहासिक काळापासून आपण बघितलं तरी हे लक्षात येईल. छ्त्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यात जिजाऊ माँ साहेबांचा जसा वाटा आहे तसाच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यात सावित्रीबाईंनी अनमोल अशी सोबत केली. आणि आजचं उदाहरण द्यायचं झालं तर सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेले डॉ बाबा आढाव यांच्या वाटचालीत त्यांची पत्नी शालिनीताई यांचा देखील वाटा अतिशय महत्वाचा आहे. अगदी शालिनीताई यांच्या सोबतीमुळे व सहकार्यामुळेच बाबा इतकं भरीव काम करू शकले, असे गौरवोद्गार भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे यांनी काढले.
संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांच्या ग्रॅव्हिटस फाउंडेशन संस्थेच्या वतीने पहिला जीवन गौरव पुरस्कार देऊन शालिनीताई यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव, ज्येष्ठ विचारवंत डॉ सदानंद मोरे, ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या संस्थापक उषा काकडे, सिंबायोसिस च्या विद्या येरवडेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, अरुण खोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
संजय काकडे म्हणाले की, डॉ बाबा आढाव यांच्या कार्याचे महत्त्व खूप आहे. आणि ते महत्व अधोरेखित करताना त्यांच्या पत्नी शालिनीताई यांची नोंद अत्यंत आवश्यक आहे. शालिनीताई यांच्या योगदानामुळेच त्यांना सन्मानित करणे विशेष आनंदाचे आहे. डॉ बाबा आढाव आणि शालिनीताई हे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी आदर्श असं जोडपं आहे. जीवनात पती व पत्नीने एकमेकांच्या साथीने यशस्वी आयुष्य कसं जगावं हेच या दोघांकडे पाहिल्यावर समजतं. डॉ बाबा आणि शालिनीताई या दोघांना उत्तम आरोग्य मिळो.