पुणे | पुणे शहर व परिसरातील नागरिकांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने दरवर्षी अतिशय रास्त दरात लाडू-चिवड्याची विक्री केली जाते. चेंबरच्या या लाडू-चिवड्याला पुण्यातून मोठी मागणी आहे. आमच्या या उत्पादनाची मागणी जास्त असली तरी त्याच्या दर्जात कमी नाही. त्यामुळेच हे सर्व लक्षात घेता येत्या १७ ऑक्टोबरपासून बुंदीचे लाडू व चिवड्याची विक्री सुरू केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ‘दि पूना मर्चंटस् चेंबर’चे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी शनिवारी दिली.
यावेळी उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, सहसचिव ईश्वर नहार, माजी अध्यक्ष प्रविण चोरबेले आदी मान्यवर उपस्थित होते.
बाठिया म्हणाले, चेंबरच्या या लाडू आणि चिवडाची मागणी संपूर्ण पुण्यातून आहे. चेंबरच्या सर्व मेंबर्सच्या देखरेखीखाली उत्कृष्ट पॅकिंगमध्ये दरवर्षी चिवडा-लाडू तयार केला जातो. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असून, याची नोंद 2012 मध्ये ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही झाली आहे. या लाडू चिवडा वितरण उपक्रमाचे यंदा ३५ वे वर्ष आहे. या लाडू-चिवड्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे पुण्यातील 20 विविध भागांत याची केंद्रे तयार करण्यात आली आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार, यावर्षी पहिल्यांदाच अर्धा किलोच्या पॅकिंगमध्ये देखील फराळ उपलब्ध केला जाणार आहे. पप्पू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जयजिनेंद्र प्रतिष्ठान येथे अहोरात्र लाडू व चिवडा बनविण्याचे काम सुरु राहणार आहे, असल्याचेही त्यांनी सांगितले.
लाडू-चिवडा विक्री वितरण केंद्रे पुढीलप्रमाणे –
चिवड्याचे वितरण दि पूना मर्चंटस् चेंबरचे मार्केट यार्डातील व्यापार-भवन, ग्राहक पेठ (एस.पी. कॉलेज समोर, टिळक रोड ), आझाद मित्र मंडळ (पुष्पमंगल कार्यालय, बिबवेवाडी), शंकरशेठ रोडवरील शेष केशर बंगला (ओसवाल बंधु, समाज कार्यालय समोर), जयश्री ग्रोसरी अँड ड्रायफ्रूटस प्रा. लि. (कोथरुड), भगत ट्रेडर्स (सिंहगड रोड), आगरवाल सेल्स कॉर्पोरेशन (कर्वेनगर), जगदीश ट्रेडिंग कंपनी (हडपसर), कुवाड कोठारी सप्लाय कंपनी (कर्वेनगर), व्ही एन. एंटरप्राईजेस (पद्मावती मंदिरासमोर), अर्बन बाझार (सिंहगड रोड), पवन ट्रेडर्स (चंदननगर), श्रीराम जनरल स्टोअर्स (चिंचवड), निखिल ग्रोसरी वर्ल्ड (आळंदी), विजय ट्रेडिंग कंपनी (कोंढवा), श्री वर्धमान जैन श्रावक संघ (आकुर्डी), श्री साई समाजिक सेवा (कसबा पेठ), श्री लक्ष्मी ब्यूटी चॉईस लेडीज शॉपी (खडकी), सह्याद्री सेवा प्रतिष्ठान (पर्वती), दीपिका दीपक नेवे (खराडी).