मुंबई | अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक (Andheri By Election) येत्या 3 नोव्हेंबरला होत आहे. या निवडणुकीच्या मैदानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली तर भाजपकडून मुरजी पटेल हे रिंगणात आहेत. मात्र, या निवडणुकीपूर्वीच भाजप मागे घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.
पोटनिवडणुकीत लटके-पटेल यांमध्येच सामना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यासंदर्भात पत्र लिहिले असून, पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे सांगितले आहे. त्यानंतर आता भाजपकडून राजकीय खलबतं सुरु आहेत. निवडणूक लढवण्यासंदर्भातील अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा, असं ठरवण्यात आले असून, केंद्रीय नेतृत्वाशी फडणवीस यासंदर्भात चर्चा करणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासंदर्भातील आवाहन भाजपला केले आहे. त्यानुसार त्यांच्यावर राजकीय दबाव वाढत असल्याची माहिती आहे. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आहे त्यामुळे आजच्या शिंदे आणि फडणवीस यांच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे.