पुणे | लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा ई स्कूल पाषाण येथे स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या ‘ध्यानसाधना’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना अध्यात्माची ओळख व्हावी या हेतूने लोकसेवा प्रतिष्ठान आणि श्रुतिसागर आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने ही व्याख्यानमाला सात दिवस झाली. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी ध्यानसाधनेबाबत मार्गदर्शन केले. या ध्यानसाधनेचा सोमवारी समारोप झाला.
लोकसेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्रीधर चव्हाण यांच्या हस्ते स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पायगुडे, लोकसेवा ई स्कूलच्या संचालिका निवेदिता मडकीकर, लोकसेवा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्रा.नरहरी पाटील, लोकसेवा ई स्कूलच्या प्राचार्या जया चेतवाणी, मुलींची सैनिकी शाळेच्या प्राचार्या लक्ष्मी कुलकर्णी, गणेश शहा, साक्षी काबरा, स्वाती बाविस्कर, संगीता पाटील, मिनु पुरोहित, विकास तिरखुंडे, सुरेश पाटील, विशाल, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्यानाची साधना चित्त शांत ठेवून करावी. मन एकाग्र होण्यासाठी प्राणायमाची साधना करावी. जीवन हे परमेश्वरमय आहे. आणि परमेश्वर हा नामरूप स्वरूप आहे. गुरू म्हणजे तत्व आहे व तत्वाला शरण जाणाऱ्यांना व भक्तीत तल्लीन होणाऱ्यांना फळ हे मिळतेच. हे फळ आनंद व समाधानाच्या स्वरूपात असते. निर्गुण व निराकार अवस्था गाठण्यासाठी संसारातील सर्व अहंकारवृत्ती आणि राग व द्वेष सोडले पाहिजेत. तरच जीवन परिपूर्ण होते, असे स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी सांगितले.
लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे दीपक पायगुडे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचे स्वामींनी कौतुक केले. याप्रसंगी लोकसेवा ई स्कूलच्या चित्रकलेच्या शिक्षकांनी स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे चैतन्यमय व हुबेहूब काढलेले व्यक्तीचित्र भेट म्हणून त्यांना देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी कुलकर्णी यांनी केले.