पुणे | गुरुनानक जयंतीनिमित्त पंजाबी खत्री समाज पुणे यांच्या तर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारीमुळे दोन वर्षानंतर संपूर्ण भारतभर ५५३ वी गुरुनानक जयंती साजरी करण्यात आली. यामुळे शीख बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
पंजाबी खत्री समाज पुणे यांच्यावतीने श्री लाड सुवर्णकार मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम भक्तीमय वातारवणात पार पडला. शीख धर्माची स्थापना करणाऱ्या गुरुनानक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गुरू मंगलसिंग गॅनी यांचे पाद्यपुजन करून पवित्र ग्रंथाचे स्वागत करण्यात आले. गुरु मंगलसिंग गॅनी यांनी ग्रंथाचे पठण व कीर्तन केले. यावेळी लंगरमध्ये सर्वांनी प्रसाद घेतला.
कार्यक्रमावेळी पंजाबी खत्री समाजाचे अध्यक्ष देविदास सवईलाल क्षत्रिय, उपाध्यक्ष सुभाष खत्री, सचिव महेंद्र खत्री, खजिनदार देविप्रसाद खन्ना, विश्वस्त मंडळातील किरणकुमार खत्री, नंदकुमार खन्ना, प्रशांत भल्ला, प्रदीप चड्डा, सचिन खत्री, राजेंद्र खत्री, मंगेश कपूर आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.