पुणे | भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व भारतीयांसाठी आदर्श व्यक्तीमत्त्व आहेत. त्यांचे ज्ञान व विद्वतेची ख्याती सर्वदूर आहे. आंबेडकरांनी त्यांच्या शिक्षणाची सुरूवात ७ नोव्हेंबर रोजी साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेऊन केली होती. या दिवसाची आठवण व प्रेरणा म्हणून संपूर्ण भारतभर ‘विद्यार्थी दिवस’ साजरा केला जातो. यानिमित्त लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी या सर्वच महापुरुषांना वंदन करत हा कार्यक्रम साजरा केला. लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य नरहरी पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. भारत पवार यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.