मुंबई | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कायम महाराष्ट्रातील थोर व्यक्तींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसतात. नुकतेच राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानांमुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे. कोश्यारींनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यानंतर राज्यात राजकीय वादंग निर्माण झाला असून, कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वत्र होऊ लागली आहे.
या सर्व घडामोडींनंतर राज्यपाल भगसिंह कोश्यारी येत्या २४ व २५ नोव्हेंबर रोजी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर होत असल्याने या दिल्ली दौऱ्याची चर्चा होत आहे.
या विधानाबद्दल राज्यपाल माफी मागणार का? दिल्लीतील पक्षश्रेष्ठी कोश्यारींची कानउघडणी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कोश्यारी यांचा हा दिल्ली दौरा पूर्वनियोजित असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, गेल्या काही दिवसांच्या वादग्रस्त विधानांनंतर कोश्यारी दिल्ली दौऱ्यावर जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, या दौऱ्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्यपालांच्या सततच्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील जनतेत भाजपची प्रतिमा कमी होण्याचे तसेच लोकांचा रोष ओढावून घेत असल्याने दिसून आल्याने पक्षश्रेष्ठींनी दिल्लीला बोलावल्याचे सांगितले जात आहे.