पिंपरी | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बेताल विधान केले होते. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापत आहे. त्यावर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाष्य केले. ”राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मात्र, त्यांच्या विरोधात जे आंदोलन सुरू आहे, ते राजकीय आहे. राज्यपालांसारख्या व्यक्तीचा अशाप्रकारे अपमान करणं योग्य नाही”.
राज्यपाल कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. त्यात आता रामदास आठवले म्हणाले, ”छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील प्रेरणास्थान होतेच, आजही ते सर्वांचे प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. त्यामुळे राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही”.
तसेच राज्यपालांनी ते आता कमी बोलणार आहेत, असे म्हटले आहे. त्यामुळे अशाप्रकारची विधाने त्यांनी टाळली पाहिजे, असा सल्लाही आठवले यांनी दिला आहे.